विकासाचा निर्धार घेऊन भाजपा–महायुतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवार मैदानात

अक्कलकोट (प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा–महायुतीतर्फे नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जांचा उत्साहात दाखल कार्यक्रम पार पाडला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले.

उमेदवारी दाखल कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यात उत्साहाचे वातावरण होते. तालुक्यासह सोलापूर जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग घेत भाजपवरील विश्वास अधोरेखित केला. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या मिरवणुकीत उमेदवारांना कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले.

अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपा–महायुतीच्या नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले उमेदवार भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

भाजपा–महायुती अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी तसेच नागरिकहितासाठी कार्यरत असून, स्थानिक विकासाला प्राधान्य देणारे सक्षम नेतृत्व देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. जयकुमारजी गोरे, आमदार श्री. देवेंद्र कोठे, तसेच श्री. मिलन कल्याणशेट्टी, सौ. अंजलीताई बाजारमठ, श्री. अतुल मेळकुंदे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
अक्कलकोट तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता निवडणुकीचा माहोल अधिक तापला असून पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.



