सोलापूर

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे ग्रामपंचायतींना स्पष्ट निर्देश; घरकुलांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा!

अक्कलकोट पंचायत समितीत आढावा बैठक, अभियानाच्या नियंत्रण कक्षाचे कुशल जैन यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे ग्रामपंचायतींना स्पष्ट निर्देश; घरकुलांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा!

अक्कलकोट पंचायत समितीत आढावा बैठक, अभियानाच्या नियंत्रण कक्षाचे कुशल जैन यांच्या हस्ते उद्घाटन

अक्कलकोट : ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासह शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि घरकुल योजनांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रत्येक ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले. अक्कलकोट पंचायत समिती येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा गावनिहाय आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

अक्कलकोट पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या बैठकीत ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची प्रगती, घरकुल बांधकामांची सद्यस्थिती, प्रलंबित मंजुरी, लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले हप्ते आणि ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कामे पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे कुशल जैन यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या घरकुलांच्या उद्दिष्टाची माहिती यावेळी सादर करण्यात आली. या योजनेंतर्गत एकूण ११ हजार १४२ घरांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी ११ हजार ८६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित ५६ घरकुलांच्या मंजुरीची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.

घरकुलांच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत वितरित करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत १० हजार ७३१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता, ६ हजार ६७९ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता, ४ हजार ७९१ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता, तर १ हजार ४३७ लाभार्थ्यांना चौथा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

मात्र, मंजूर घरकुलांच्या तुलनेत पूर्ण झालेल्या घरांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. आतापर्यंत ३ हजार २३५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, घरपूर्णत्वाचे प्रमाण २९.०३ टक्के आहे.

घरकुल योजनेत मंजुरी मिळाल्यानंतरही ज्या लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही, अशा प्रकरणांचा संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी तातडीने पाठपुरावा करावा. लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून घरकुलांचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.

घरकुल योजनांची केवळ मंजुरी आणि हप्ता वितरणापुरती पूर्तता न करता प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण करण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियमित आढावा घेऊन बांधकामातील अडचणी दूर कराव्यात. प्रलंबित घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश कुशल जैन यांनी दिले. अभियानांतर्गत निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कामांचे नियोजन, विभागीय समन्वय आणि नियमित देखरेख यांना महत्त्व देण्याची सूचना त्यांनी केली.

ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या विविध विकासकामांचा नियमित आढावा घेऊन प्रलंबित बाबींचा निपटारा करावा. शासनाच्या योजनांची mअंमलबजावणी करताना पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे काम करून ग्रामीण विकासाची कामे अधिक गतिमान करावीत, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अक्कलकोट पंचायत समिती येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते करण्यात आले.

अभियानाच्या कामकाजाचे नियोजन, प्रगतीचा आढावा आणि विविध स्तरांवरील समन्वय यासाठी नियंत्रण कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अभियानांतर्गत ग्रामपंचायतींनी केलेल्या कामांचा पाठपुरावा करून निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या यंत्रणेचा प्रभावी वापर करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

बैठकीदरम्यान जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. अभियानाची उद्दिष्टे, ग्रामपंचायत स्तरावर करावयाची कार्यवाही आणि विविध विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती त्यांनी दिली.

ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागातून अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या आढावा बैठकीस प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी अमोल मुंडे, गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता विद्याधर राठोड, पशुसंवर्धन अधिकारी दीपक कडवे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता विशाल लेंगरे, जलसंधारण विभागाचे अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विकासकामांची गती वाढविणे, घरकुल योजनांतील प्रलंबित कामे पूर्ण करणे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे, या उद्देशाने झालेल्या या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी वेळेत उद्दिष्टपूर्ती करण्यावर विशेष भर दिला. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!