क्राईम

ऊसाच्या शेतात तब्बल १ कोटी ५ लाखांचा गांजा जप्त ; अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई

गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई; १२ फूट उंचीची २१० जिवंत व ३० वाळलेली गांजाची झाडे आढळली

ऊसाच्या शेतात तब्बल १ कोटी ५ लाखांचा गांजा जप्त ; अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई

गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई; १२ फूट उंचीची २१० जिवंत व ३० वाळलेली गांजाची झाडे आढळली

अक्कलकोट : अंमली पदार्थांच्या विरोधात सोलापूर जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला अक्कलकोट दक्षिण पोलिसांच्या कारवाईत मोठे यश मिळाले आहे. मौजे आळगी, ता. अक्कलकोट येथील एका ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी तब्बल २११ किलो १०० ग्रॅम गांजासदृश्य वनस्पती जप्त केल्या आहेत. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध लागवड, विक्री व तस्करीविरोधात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती.

दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व त्यांचे पथक अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करजगी दूरक्षेत्र परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत मौजे आळगी येथील एका शेतात ऊसाच्या पिकामध्ये गांजासदृश्य वनस्पतींची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ही बाब उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक संबंधित शेतात दाखल झाले.

पोलिसांनी शेताची पाहणी केली असता ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी गांजासदृश्य झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. यातील काही झाडांची उंची तब्बल १२ फुटांपर्यंत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

पंचासमक्ष करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान पोलिसांना एकूण २४० गांजाची झाडे आढळून आली. त्यापैकी २१० झाडे जिवंत, तर ३० झाडे वाळलेल्या अवस्थेत होती. ही सर्व झाडे जप्त करून त्यांचे वजन करण्यात आले असता एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम भरले. या मुद्देमालाची अंदाजे बाजारातील किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

ऊसाच्या दाट पिकाचा आडोसा घेत गांजाची लागवड करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे संबंधित शेतात ही लागवड नेमकी किती कालावधीपासून सुरू होती, त्यासाठी बियाणे अथवा रोपे कुठून आणण्यात आली आणि या लागवडीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५३१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

या मोठ्या कारवाईनंतर आता पोलिसांच्या तपासाची दिशा गांजाच्या लागवडीपासून त्याच्या संभाव्य विक्रीपर्यंत पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, लागवडीसाठी आवश्यक साहित्य अथवा बियाणे कुठून आणण्यात आले, तसेच तयार झालेला गांजा कोणाला आणि कुठे विकला जाणार होता, याबाबत तपास केला जात आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक राजशेखर निंबाळे यांच्यासह अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

अंमली पदार्थांच्या अवैध लागवडीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे ग्रामीण भागात शेतमालाच्या आड सुरू असलेल्या अशा प्रकारच्या बेकायदेशीर लागवडीवर पोलिसांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!