वीर बाल दिवसाचे औचित्य : राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५’; छत्रपती संभाजीनगरच्या अर्णव महर्षीचा देशपातळीवर गौरव

वीर बाल दिवसाचे औचित्य : राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५’; छत्रपती संभाजीनगरच्या अर्णव महर्षीचा देशपातळीवर गौरव
नवी दिल्ली :- वीरबालदिवस च्या औचित्याने नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात देशभरातील २० गुणवंत बालकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी निवड करण्यात आलेल्या या बालकांमध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षी याचाही समावेश असून, त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की, “ही बालके भारताच्या अमृतपिढीचे खरे प्रतिनिधी आहेत. शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच विविध सामाजिक आव्हानांवर मात करत त्यांनी शौर्य, कला-संस्कृती, पर्यावरण, नवाचार, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.” या पुरस्कारामुळे युवा पिढीतील शौर्य, धैर्य, सर्जनशीलता आणि संवेदनशीलतेला बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती मुर्मू यांनी पुढे नमूद केले की, या बालकांच्या संकल्पबद्ध प्रयत्नांमुळेच २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. समाजासाठी योगदान देणारी ही पिढी देशाच्या उज्ज्वल भवितव्याची दिशा ठरवेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील १७ वर्षीय अर्णव महर्षी याला विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी प्रधानमंत्री ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अर्णवने लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांच्या पुनर्वसनासाठी एआय (Artificial Intelligence) आधारित पुनर्वास उपकरण तसेच ॲक्टिव्ह हँड रिस्ट बँड विकसित केला आहे. या नवोन्मेषी उपकरणाच्या मदतीने रुग्णांना हातांच्या हालचालींमध्ये सुधारणा करण्यास मोठी मदत होणार आहे.
विशेष म्हणजे, अर्णव महर्षी यांनी स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या साहाय्याने हे उपकरण विकसित केले असून, कमी खर्चात आणि अधिक प्रभावी उपचाराची संधी या संशोधनामुळे उपलब्ध होणार आहे. त्यांच्या या कार्याचे देशभरातून कौतुक होत असून, महाराष्ट्रासाठी हा गौरवाचा क्षण ठरला आहे.



