मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस अलर्ट; विजय मिरवणुका व डीजेवर बंदी
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस अलर्ट; विजय मिरवणुका व डीजेवर बंदी
सोलापूर (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ची मतदान प्रक्रिया दिनांक 07 फेब्रुवारी 2026 रोजी शांततेत पार पडली असून 09 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निकालाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले असून कडक बंदोबस्त व विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
मतमोजणीदरम्यान विजय उत्सव, प्रतिस्पर्धी गटांतील तणाव किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून अग्रिम गुप्त माहिती संकलन सुरू आहे. आवश्यक ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून विजयी उमेदवारांची मिरवणूक, रॅली किंवा जाहीर सभा यांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
मतमोजणी केंद्रांवर कठोर बॅरिकेडिंग, पुरेसा पोलीस बंदोबस्त व आवश्यक सुरक्षा साहित्य तैनात करण्यात आले आहे. विजयी व पराभूत उमेदवारांचे समर्थक समोरासमोर येणार नाहीत, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. सर्व पोलीस वाहनांवरील ध्वनीवर्धक (P.A. सिस्टम) कार्यरत ठेवण्यात आले असून जमाव नियंत्रणासाठी त्याचा वापर केला जाणार आहे.
पोलीस प्रशासनाने डीजे, प्रेशर हॉर्न, मॉडिफाइड सायलेन्सर किंवा अत्याधिक आवाज करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. उमेदवारांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात येत आहेत.
संवेदनशील भाग व प्रमुख चौकांवर पोलीस पिकेट्स उभारण्यात आले असून क्षेत्रनिहाय व झोननिहाय सतत पेट्रोलिंग सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः संवेदनशील भागात गस्त घालत आहेत. तसेच व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून अफवा किंवा चिथावणीखोर संदेशांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
राज्य राखीव पोलीस दल, स्ट्राईक फोर्स तसेच उपलब्ध सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून राज्य उत्पादन शुल्क व महसूल विभागाशी समन्वय साधून संयुक्त कारवाई केली जाणार आहे. मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाल्यावरही कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीस परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कायदा भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी दल तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.



