महाराष्ट्र

१९ जानेवारीला पुण्यात काय घडणार? प्रमुख रस्त्यावरील शाळा- कॉलेजस बंद!

१९ जानेवारीला पुण्यात काय घडणार? प्रमुख रस्त्यावरील शाळा- कॉलेजस बंद!

पुणे (प्रतिनिधी) :- पुणे शहरात १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ च्या पार्श्वभूमीवर, सोमवार दि. १९ जानेवारी २०२६ रोजी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे अधिकृत आदेश काढले आहेत.

या स्पर्धेतील पहिली व महत्त्वाची ‘प्रोलॉग रेस’ सोमवार, १९ जानेवारी रोजी पुणे शहरात होणार आहे. या रेसदरम्यान सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत शहरातील काही प्रमुख रस्ते पूर्णतः वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोड (एफ.सी. रोड), गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता (जे.एम. रोड) तसेच या मार्गांना जोडणारे सर्व उपरस्ते समाविष्ट आहेत.

रस्ते बंद राहिल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, विशेषतः विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येऊ शकतात. ही संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा-महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

या निर्णयानुसार पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड, विश्रामबागवाडा-कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, सिंहगड रोड तसेच वारजे-कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच सर्व व्यावसायिक शिक्षण संस्था सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी बंद राहणार आहेत.

दरम्यान, हा सुट्टीचा आदेश केवळ एकाच दिवसापुरता लागू राहणार असून, मंगळवार दि. २० जानेवारी २०२६ पासून सर्व शैक्षणिक संस्था नियमित वेळापत्रकानुसार सुरू होतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत करण्यात येणारे बदल लक्षात घेऊन नागरिकांनी, पालकांनी व वाहनचालकांनी आपल्या दैनंदिन कामांचे नियोजन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!