सोलापूर

अक्कलकोटमध्ये महामार्ग कामासाठी नियमबाह्य ब्लास्टींग; घरांना तडे, शेतजमीन नापीक, नागरिक दहशतीत

अक्कलकोटमध्ये महामार्ग कामासाठी नियमबाह्य ब्लास्टींग; घरांना तडे, शेतजमीन नापीक, नागरिक दहशतीत

अक्कलकोट (प्रतिनिधी):- तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरालगत बासलेगाव रस्त्यावरील कोहिनूर मंगल कार्यालय परिसरात सुरू असलेल्या सूरत–चेन्नई महामार्गाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संबंधित ठेकेदार कंपनीकडून नियमांना बगल देत अवैधरित्या बोर गाडी व १० फुटी ड्रिलच्या साहाय्याने सुरुंग लावून मोठ्या प्रमाणात ब्लास्टींग करण्यात येत आहे. या अनियंत्रित ब्लास्टींगमुळे परिसरातील अनेक घरे तडकली असून काही घरे कोसळण्याच्या मार्गावर आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ब्लास्टींगमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू असलेल्या स्फोटांमुळे रस्त्यावर मोठमोठे दगड कोसळत आहेत. काही दिवसांपूर्वी बासलेगावकडे जाणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराच्या अगदी बाजूलाच ५ ते १० किलो वजनाचा दगड पडला. सुदैवाने तो आणि त्यांची पत्नी थोडक्यात बचावले, मात्र हा प्रकार गंभीर अपघाताला आमंत्रण देणारा ठरू शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

या ब्लास्टींगचा थेट परिणाम परिसरातील वसाहतींवर झाला असून अनेक कुटुंबांच्या घरांना मोठे तडे गेले आहेत. विशेष म्हणजे काही घरांच्या बोअरवेलमधील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटली असून भविष्यात पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. महिलांपासून वयोवृद्ध आणि लहान मुलांपर्यंत सर्वजण जीव मुठीत धरून दिवस काढत आहेत.

परिसरातील उरुजपाशा पिरजादे, नागराज कुंभार, प्रशांत गुरव, सुनील गोरे, सिद्धाराम पाटील, इनायत शेख, रमेश शिंदे, दिगंबर साळुंखे, गुरप्पा कुंभार, सुनील आळंद, अविनाश कोरे, विजयकुमार मलंग, विकास जकापुरे, संगमेश्वर स्वामी, सचिन डिग्गे, शशिकांत कुंभार, करेप्पा रोळ्ळी, अलका दसले, उज्वला फडतरे, विजयालक्ष्मी कुंभार आदी नागरिकांच्या घरांना तडे गेले आहेत. नुकसान भरपाई मिळावी, यासाठी नागरिकांनी कंपनीकडे तसेच लोकप्रतिनिधींकडे अनेकदा तोंडी तक्रारी केल्या आहेत. आता लेखी निवेदन देण्याची तयारी सुरू आहे.

दरम्यान, या अवैध ब्लास्टींगप्रकरणी पोलिस निरीक्षक दीपक भिताडे यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत ठेकेदारांच्या प्रतिनिधींना सूचना दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांची सर्रास पायमल्ली होत असून ब्लास्टींग पूर्ववत सुरूच आहे.

महामार्गालगतच्या शेतकऱ्यांनाही या कामाचा मोठा फटका बसला आहे. नागनहळ्ळी येथील शेतकरी अहमदपाशा पिरजादे यांनी सांगितले की, महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या ब्लास्टींगमुळे धुळीचा प्रचंड त्रास होत असून पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून दोन एकर शेतजमिनीत पावसाचे पाणी साचून ती जमीन नापीक झाली आहे. यामुळे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून कंपनीने नुकसान भरपाई न दिल्यास उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.

सूरत–चेन्नई महामार्गाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असले तरी अलीकडील एक ते दोन महिन्यांपासून वसाहत परिसरात दिवस-रात्र अवैध ब्लास्टींग वाढले आहे. याकडे तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे तहसीलदार व लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून ब्लास्टींगला पायबंद घालावा आणि ठेकेदाराला पर्यायी सुरक्षित पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा श्री वटवृक्ष गणेश मंडळाच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!