बौद्ध संस्थांसाठी आनंदाची बातमी! पायाभूत सुविधांसाठी १० लाखांपर्यंत अनुदान…पण अर्जाला आहे अंतिम मुदत

बौद्ध संस्थांसाठी आनंदाची बातमी! पायाभूत सुविधांसाठी १० लाखांपर्यंत अनुदान…पण अर्जाला आहे अंतिम मुदत
मुंबई (प्रतिनिधी ):- राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या आणि ज्या संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा अधिक बौद्ध समाजातील विश्वस्त अथवा सदस्य आहेत, अशा बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत रु. १० लाखांपर्यंत अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सदर योजनेचा लाभ घ्यावयाच्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र संस्थांनी दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अनुदान योजनेसाठी शासन परिपत्रक दि. २७ जानेवारी २०२६ मधील अटी व शर्ती विचारात घेऊन, संस्थांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करणारी संस्था ही राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असणे आवश्यक असून, नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच संस्थेच्या विश्वस्त किंवा सदस्यांपैकी किमान ५१ टक्के सदस्य बौद्ध समाजातील असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत ज्या संस्थांनी यापूर्वी अनुदानाचा लाभ घेतला आहे, त्यांनी त्या अनुदानाचा वापर मंजूर प्रयोजनासाठीच केला असल्याचे प्रमाणित करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्या प्रतिस्वाक्षरीसह विहीत नमुन्यातील उपयोगिता प्रमाणपत्र (Utilization Certificate) सादर करणे बंधनकारक राहील.
सदर माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी यांनी दिली असून, पात्र संस्थांनी मुदतीत व पूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



