जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; मतदान कधी होणार पहा
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; मतदान कधी होणार पहा
सोलापूर (प्रतिनिधी):- महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच, या निवडणुकांच्या मुदतीबाबत मोठा निर्णय झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आता १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र, आरक्षणासंदर्भातील अडचणींमुळे निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे कठीण होत असल्याने, राज्य निवडणूक आयोगाने १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
राज्यातील परिस्थिती पाहता, १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण आहे, तर उर्वरित २० जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुका कशा पद्धतीने घ्यायच्या, याबाबत निर्णय प्रलंबित असल्याने संभ्रम निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर आज दि. १२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाने आपली भूमिका मांडत अधिक वेळेची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आयोगाची मागणी मान्य करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्यास परवानगी दिली आणि १५ दिवसांची मुदतवाढ मंजूर केली.
या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला दिलासा मिळाला असून, आता १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर होणाऱ्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



