महिला सुरक्षेसाठी मोठा निर्णय; परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते ‘बीग्सी’ सेवेचा शुभारंभ
महिला सुरक्षेसाठी मोठा निर्णय; परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते ‘बीग्सी’ सेवेचा शुभारंभ
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, महाराष्ट्र पोलीस, मोटार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्युशन यांच्या संयुक्त सहकार्याने काळी-पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षांसाठी ‘#बीग्सी (BYGSY)’ या अभिनव सेवेचा राज्यभर शुभारंभ करण्यात आला आहे. या सेवेचा प्रारंभ परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी सह परिवहन आयुक्त शैलेश कामत, वाहतूक पोलीस उपआयुक्त अजित बोगार्डे, मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील तसेच बीग्सीचे संस्थापक प्रा. निरंजन भट यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी स्पष्ट केले की, महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग आणि परिवहन विभागाच्या सहकार्याने हा खर्चमुक्त उपक्रम सुरू करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याचा उद्देश या सेवेच्या माध्यमातून साध्य होणार आहे.
‘बीग्सी’ ही सेवा सामाजिक जाणिवेतून सुरू करण्यात आली असून, टॅक्सी व ऑटोरिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी विकसित करण्यात आली आहे. ही सेवा मोफत असून, भविष्यात राज्यभरात मोठ्या प्रमाणावर तिचा विस्तार करण्यात येणार आहे.
हा उपक्रम केवळ तांत्रिक सेवा नसून, महिला सुरक्षेच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल असल्याचे मत व्यक्त करत, भविष्यात ‘बीग्सी’ महिला सुरक्षेचा नवा अध्याय लिहील, असा विश्वास परिवहन आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातील टॅक्सी व ऑटोरिक्षा प्रवास अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि निर्भय बनवण्याच्या दिशेने ‘बीग्सी’ सेवा मैलाचा दगड ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



