देश - विदेश

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर यंदा काहीतरी खास … महाराष्ट्राचा चित्ररथ नेमकं काय दाखवणार?

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर यंदा काहीतरी खास … महाराष्ट्राचा चित्ररथ नेमकं काय दाखवणार?

नवी दिल्ली :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनात यंदा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वैभवाचा आणि आत्मनिर्भरतेचा जयघोष निनादणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या वतीने ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित देखणा आणि अर्थपूर्ण चित्ररथ यंदा सादर करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असलेल्या ऐतिहासिक वर्षात होणारा हा सोहळा अधिकच विशेष ठरणार आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ राज्याची सांस्कृतिक परंपरा, सामाजिक चळवळ आणि आर्थिक सामर्थ्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडवणार आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याला आणि सामाजिक एकतेला नवे बळ दिले. त्याच परंपरेतून आज गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय आत्मनिर्भरतेचे प्रभावी प्रतीक कसा ठरला आहे, हे या चित्ररथातून मांडण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवामुळे मूर्तिकार, सजावटकार, कलाकार, वादक, लघुउद्योग आणि सेवा क्षेत्राला मिळणारा रोजगार तसेच कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने २०२५ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ चा दर्जा दिला असून, या निर्णयामुळे सांस्कृतिक जतनासोबतच पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासालाही चालना मिळत असल्याचे चित्ररथातून प्रभावीपणे सादर केले आहे.

*चित्ररथाची वैशिष्ट्ये*

महाराष्ट्राचा हा चित्ररथ अत्यंत कलात्मक, देखणा आणि अर्थपूर्ण आहे.

* चित्ररथाच्या अग्रभागी महाराष्ट्राच्या ऊर्जेचे प्रतीक असलेला भव्य ढोल आणि तो वाजवणारी पारंपारिक वेशभूषेतील महिला राज्याच्या सशक्त स्त्रीशक्तीचे दर्शन घडवते.

* मध्यभागी गणपतीची आकर्षक मूर्ती साकारणारा मूर्तिकार आणि विसर्जनासाठी निघालेला गणेशभक्त दाखवण्यात आला आहे.

* शेवटच्या भागात महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक गणपती मंदिरांची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

* चित्ररथाच्या दोन्ही बाजूंना नऊवारी साडी परिधान केलेल्या महिलांचे लेझीम पथक महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडवणार आहे.

हा संपूर्ण सोहळा ‘जनभागीदारी’ या संकल्पनेवर आधारित असून, प्रजासत्ताक दिनानंतर २६ ते ३१ जानेवारीदरम्यान लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘भारत पर्व’ मध्येही महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक समृद्धीचा आणि आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचा अनुभव देशवासियांना घेता येणार आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!