मकर संक्रातीला ‘लाडकी बहिणी’ला मोठी भेट? व्हायरल दाव्या मागचं सत्य काय…?
मुंबई (प्रतिनिधी):- मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत महिलांना शिलाई मशीन, साड्या आणि अतिरिक्त रोख रक्कम देण्यात येणार असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र, हा दावा पूर्णतः खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागासह संबंधित अधिकृत यंत्रणांनी अशा कोणत्याही भेटवस्तू किंवा अतिरिक्त आर्थिक लाभाची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर, परिपत्रकांमध्ये किंवा प्रसिद्धीपत्रकांमध्येही याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या संदेशांमध्ये काही फसवे लिंक, बनावट पोस्टर आणि खोटी आश्वासने देऊन महिलांची वैयक्तिक माहिती मागवली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा संदेशांना बळी पडल्यास आर्थिक फसवणूक किंवा माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य शासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवा, अप्रामाणिक पोस्ट किंवा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये. कोणतीही शासकीय योजना, लाभ किंवा बदल याबाबतची माहिती केवळ अधिकृत माध्यमांतूनच जाहीर केली जाते. संशयास्पद संदेश, लिंक किंवा जाहिराती टाळाव्यात आणि अशा अफवांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी.
दरम्यान, ‘लाडकी बहीण योजना’ ही ठरावीक निकषांनुसार चालू असून, त्यात मकर संक्रांतीनिमित्त कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू किंवा अतिरिक्त आर्थिक लाभाचा समावेश नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी सतर्क राहून सत्य माहितीचीच खातरजमा करावी, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

More Stories
महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ : एक मत ठरवणार शहराची पुढील दिशा
राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद