राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत कर्तुत्ववान मातांचा सन्मान, ६६ जणांचे रक्तदान

सोलापूर (प्रतिनिधी):- “छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटविण्याचे कार्य राजमाता जिजाऊंनी केले. जिजाऊंचे संस्कार, त्याग आणि दूरदृष्टीमुळेच शिवराय घडले आणि हीच प्रेरणा पुढे संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरली,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.


राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, जिल्हा परिषद शाखा यांच्या वतीने जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा परिषदेतील जिजाऊ व सावित्रीच्या लेकींचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी कादर शेख, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, कार्यकारी अभियंते संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी जिल्हा परिषदेमधील खातेप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांच्या मातांचा कर्तृत्ववान महिला म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. सर्व सन्मानार्थींना मानाचा फेटा बांधून गौरवण्यात आले. प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जिजाऊ वंदना अश्विनी भोसले यांनी सादर केली, तर राज्यगीत मोहम्मद अयाज यांनी गायले.

कार्यक्रमात मालती कोहिणकर, उषा जगताप, छाया पाटील, वनमाला भुजबळ, माया जाधव, मंगला मिरकले, कल्पना वाकडे, सुदामती जगताप, प्रभावती नवले, नंदाबाई हावळे, कलावती धनशेट्टी, बायडाबाई कवितके, सविता कदम, वनिता जमदाडे, चंद्रभागा पांढरे, कुसूम कुलकर्णी, लियाकत शेख, सुनिता राऊत आदींचा सन्मान करण्यात आला.

जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सभागृहात दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ६६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.
यावेळी बोलताना सिईओ कुलदीप जंगम म्हणाले, “आई म्हणजे त्याग, न्याय, शिस्त आणि संस्कारांची मूर्ती आहे. हेच संस्कार जिजाऊंनी शिवरायांवर केले. माझ्या जीवनातही आईचा मोठा प्रभाव आहे. आई-वडिलांच्या संस्कारामुळेच आज आम्ही घडलो. आईला पर्याय फक्त ‘त्याग’ हा शब्दच आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

More Stories
सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर
वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात टाळता येतील – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ३७ व्या जिल्हा रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन; ‘जीवनदीप’ पुरस्काराने जीवनदूतांचा गौरव
अक्षता सोहळ्यानंतर मंदिर परिसर झळाळला; जयोस्तुते फाउंडेशनच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक