Prabuddha Raj

Latest Marathi News

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषेच्या वेळापत्रकात बदल; ऑनलाईन नोंदणी १६ जानेवारीपर्यंत वाढ

Oplus_16908288

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषेच्या वेळापत्रकात बदल; ऑनलाईन नोंदणी १६ जानेवारीपर्यंत वाढ

मुंबई (प्रतिनिधी):- राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५-२६ या राज्यव्यापी उपक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी असलेली ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आता १६ जानेवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर यांच्यामार्फत घेण्यात येणारे परीक्षापूर्व १५ दिवसांचे ऑनलाईन संविधान प्रशिक्षण १८ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.

हा उपक्रम महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाची मूल्ये, हक्क, कर्तव्ये आणि लोकशाही व्यवस्थेची जाणीव वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या राज्यव्यापी उपक्रमात इयत्ता ८ वी पासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असून, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संविधानाविषयीचे ज्ञान वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.