१५ जानेवारीपासून सर्व ज्येष्ठांना पेन्शन?सोशल मीडियावरील दावा भ्रामक असल्याचे शासनाचे स्पष्टीकरण

१५ जानेवारीपासून सर्व ज्येष्ठांना पेन्शन?सोशल मीडियावरील दावा भ्रामक असल्याचे शासनाचे स्पष्टीकरण
मुंबई (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासन १५ जानेवारी २०२६ पासून राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹५,००० पेन्शन तसेच मोफत वस्तू देणार असल्याचा दावा करणारा एक व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. मात्र हा दावा पूर्णतः खोटा आणि भ्रामक असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (DGIPR) यांनी स्पष्ट केले आहे.
DGIPRच्या अधिकृत #FactCheck अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत असे निदर्शनास आले आहे की, राज्य शासनाने अशी कोणतीही नवीन योजना जाहीर केलेली नाही किंवा यासंदर्भात कोणताही अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केलेला नाही. त्यामुळे व्हायरल व्हिडिओतील माहिती तथ्यहीन असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या पेन्शन योजना या ठराविक पात्रता निकषांवर आधारित आहेत. उत्पन्न मर्यादा, वयोमर्यादा, सामाजिक-आर्थिक घटक आणि इतर अटींची पूर्तता झाल्यासच लाभ दिला जातो. सर्व ज्येष्ठ नागरिकांना सार्वत्रिकरित्या दरमहा ₹५,००० पेन्शन देण्याची कोणतीही योजना अस्तित्वात नाही.
DGIPRने नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा अफवा, व्हिडिओ किंवा संदेशांवर त्वरित विश्वास ठेवू नये. कोणतीही शासकीय योजना, आर्थिक लाभ किंवा सवलतींबाबत माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत संकेतस्थळे, अधिकृत प्रसिद्धीपत्रके, किंवा अधिकृत घोषणाच प्रमाण मानाव्यात.
अशा प्रकारच्या भ्रामक माहितीमुळे नागरिकांची दिशाभूल होतेच, शिवाय शासनाच्या योजनांबाबत गैरसमज पसरतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून माहितीची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे DGIPRने स्पष्ट केले आहे.



