महाराष्ट्र

पुणे आणि बीडला नवे पालकमंत्री : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती

पुणे आणि बीडला नवे पालकमंत्री : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती

मुंबई : पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या प्रशासकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी करत दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची नियुक्ती निश्चित केली आहे.

दि. 03 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे पुणे व बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या दि. 9 फेब्रुवारी 2026 पासून मंत्रालयीन व जिल्हास्तरीय प्रशासकीय सूत्रे अधिकृतपणे स्वीकारणार आहेत.

यापूर्वी पुणे व बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून दिवंगत उपमुख्यमंत्री श्री. अजित आशाताई अनंतराव पवार कार्यरत होते. त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे संबंधित दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद रिक्त झाले होते. या रिक्ततेमुळे विकासकामांच्या आढाव्यासह विविध प्रशासकीय निर्णय प्रक्रियेवर मर्यादा येत होत्या.

ही बाब लक्षात घेता, शासन निर्णय क्रमांक जिपामं-१३२४/प्र.क्र.४७/रवका-२, दि. 18 जानेवारी 2025 मध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. सुधारित निर्णयान्वये, पूर्वी नमूद पालकमंत्र्यांच्या ऐवजी नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती अधिकृतपणे करण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार, पुणे व बीड जिल्ह्यांतील विकासकामांचा समन्वय, जिल्हा नियोजन समितीचे कामकाज, प्रशासकीय यंत्रणांवर देखरेख तसेच जनहिताशी संबंधित निर्णय प्रक्रिया आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, तो डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा निर्णय जारी करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या प्रशासनाला स्थैर्य मिळून विकासात्मक निर्णय प्रक्रियेला गती मिळेल, अशी प्रशासकीय स्तरावर अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!