एमआयएम पक्षाला मोठा धक्का; फारूक शाब्दी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा

एमआयएम पक्षाला मोठा धक्का; फारूक शाब्दी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा
सोलापूर :- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्षाला महाराष्ट्रात मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाचे वरिष्ठ व प्रभावी नेते फारूक मकबूल शाब्दी यांनी AIMIM पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच त्यांच्या कडे असलेल्या सर्व पक्षीय पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा थेट AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे सादर केला आहे.

फारूक मकबूल शाब्दी हे AIMIM मधील महत्त्वाचे नेतृत्व मानले जात होते. ते
प्रदेश कार्याध्यक्ष – महाराष्ट्र,
शहर जिल्हाध्यक्ष – सोलापूर,
अध्यक्ष – मुंबई शहर
या जबाबदाऱ्या सांभाळत होते. मात्र आता त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा पत्रात फारूक शाब्दी यांनी पक्षाने दिलेल्या संधी, विश्वास आणि जबाबदाऱ्यांबद्दल आभार मानले आहेत. AIMIM मध्ये कार्यरत असताना मिळालेला अनुभव व सहकार्य याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, “माझा सदस्यत्वाचा व पदांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा” अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे. या राजीनाम्याची प्रत AIMIM चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि सोलापूर शहर निरीक्षक अन्वर सादात यांनाही पाठविण्यात आली आहे.
फारूक मकबूल शाब्दी यांनी दोन वेळा आमदारकीची निवडणूक लढवली होती.
२०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना जोरदार टक्कर दिली होती. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली होती आणि अखेरीस प्रणिती शिंदे यांचा विजय झाला. तर २०२४ च्या निवडणुकीत भाजपचे देवेंद्र कोठे यांच्याविरुद्धही शाब्दी यांनी कडवी लढत दिली होती. त्या वेळी भाजपला मोठा संघर्ष करावा लागला आणि अखेर देवेंद्र कोठे विजयी झाले.
सोलापूर शहरात फारूक शाब्दी यांचा मोठा जनसंपर्क आणि प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या अचानक दिलेल्या सदस्यत्वाच्या राजीनाम्यामुळे AIMIM चे कार्यकर्ते आणि शाब्दी यांचे समर्थक नाराज असल्याचे चित्र आहे. शहरात सध्या एकच चर्चा सुरू आहे – राजीनामा इतक्या अचानक का दिला? यामागचे नेमके कारण काय?
दरम्यान, या सदस्यत्वाच्या राजीनाम्यामुळे AIMIM मधील अंतर्गत घडामोडी, संघटनात्मक बदल आणि भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः महाराष्ट्रातील AIMIM च्या संघटनात्मक रचनेवर या निर्णयाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता पुढे फारूक मकबूल शाब्दी यांची पुढील राजकीय दिशा काय असणार आणि AIMIM पक्ष या सदस्यत्वाच्या राजीनाम्यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



