क्राईम

भेटीचा बहाणा… सोन्याचा डाव… आणि निर्घृण खून! तृतीयपंथी हत्येचा ६ तासांत उलगडा

भेटीचा बहाणा… सोन्याचा डाव… आणि निर्घृण खून! तृतीयपंथी हत्येचा ६ तासांत उलगडा

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहरात घडलेल्या तृतीयपंथीच्या निर्घृण खुनाच्या घटनेचा अवघ्या ६ तासांत उलगडा करत गुन्हे शाखा सोलापूर शहर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या खूनप्रकरणी तीन आरोपींना लातूर येथून अटक करण्यात आली असून, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०:३० ते २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १:३० या कालावधीत अयुब हुसेन सय्यद (तृतीयपंथी) यांचा त्यांच्या राहत्या घरात — घर नं. २२६, पहिला मजला, पेंढारी मस्जिदच्या पाठीमागे, मुर्गी नाला, उत्तर सदर बझार, लष्कर — अज्ञात इसमांनी खून केला होता. या घटनेनंतर सदर बझार पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Oplus_16908288

घटनेची गंभीरता लक्षात घेता, पोलीस आयुक्त सोलापूर शहर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखा व सदर बझार पोलीस ठाण्याच्या पथकांना तातडीच्या तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत तांत्रिक तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे हा खून तीन आरोपींनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले. तपासात आरोपी लातूर जिल्ह्याच्या दिशेने पसार झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, पोलीस पथक तातडीने लातूरकडे रवाना झाले.

लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या मदतीने खालील आरोपींना अटक करण्यात आली :
* यशराज उत्तम कांबळे (वय २१, विद्यार्थी)
* आफताब इसाक शेख (वय २४, मजूर)
* वैभव गुरूनाथ पनगुले (विद्यार्थी)
(सर्व रा. लातूर जिल्हा)

चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी क्रमांक २ आफताब शेख व मयत अयुब सय्यद हे पूर्वीपासून ओळखीचे होते. आफताब शेख वारंवार सोलापूरला येत असल्याने, अयुब सय्यदकडे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याची माहिती त्याला होती. त्याच लालसेतून तिघांनी भेटीचा बहाणा करून लूट करण्याचा कट रचला.

तिन्ही आरोपी युनिकॉर्न मोटारसायकलवर सोलापूरला आले आणि अयुब सय्यद यांच्या घरातच निर्घृण खून करून सोन्यासारखे दिसणारे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन लंपास केला. खून केल्यानंतर त्यांनी मयताची यामाहा स्कूटी देखील चोरून नेल्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे करीत असून, आरोपींना मा. न्यायालयाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संपूर्ण कारवाईबद्दल गुन्हे शाखा व सदर बझार पोलीस ठाण्याच्या पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. अवघ्या काही तासांत खुनाचा पर्दाफाश करून आरोपींना जेरबंद केल्याने सोलापूर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!