१२५ वर्षांनंतर भारतात परतले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष; दिल्लीतील राय पिथौरा संकुलात भव्य प्रदर्शन
१२५ वर्षांनंतर भारतात परतले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष; दिल्लीतील राय पिथौरा संकुलात भव्य प्रदर्शन
नवी दिल्ली :- भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र अवशेष १२५ वर्षांनंतर भारतात परत आणण्यात आले असून, दिल्लीतील राय पिथौरा सांस्कृतिक संकुलात हे अवशेष सर्वसामान्य नागरिकांच्या दर्शनासाठी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. या ऐतिहासिक व आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष पुन्हा आपल्या देशात परत आले, हे आपल्या सर्वांसाठी सौभाग्याचे क्षण आहेत. हे अवशेष आपल्याला परत मिळाल्याने आपण धन्य झालो आहोत.”
बुद्धांच्या विचारांचा आणि तत्त्वज्ञानाचा आपल्या जीवनावर खोल प्रभाव असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “भगवान बुद्धांनी मानवतेला शांती, करुणा आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. त्यांच्या शिकवणीने केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला दिशा दिली आहे.” आजच्या काळातही बुद्धांचे विचार जागतिक शांततेसाठी तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१२५ वर्षांपूर्वी भारताबाहेर गेलेले हे अवशेष विविध देशांत जतन करण्यात आले होते. दीर्घ प्रयत्नांनंतर हे अवशेष पुन्हा भारतात आणण्यात यश आले असून, ही घटना देशाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशासाठी ऐतिहासिक मानली जात आहे.
राय पिथौरा सांस्कृतिक संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनासाठी देश-विदेशातून बौद्ध अनुयायी, अभ्यासक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या माध्यमातून भगवान बुद्धांच्या जीवनकार्याची आणि त्यांच्या शिकवणीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



