सोशल मीडियावर कोण प्रचारतोय गुपचूप? महापालिकेची विशेष नजर सुरू

सोशल मीडियावर कोण प्रचारतोय गुपचूप? महापालिकेची विशेष नजर सुरू
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर सोशल व इलेक्ट्रॉनिक मीडियावरील छुप्या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती स्थापन करून ती कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
निवडणूक काळात पूर्वप्रमाणिकरण न करता करण्यात येणारा इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावरील प्रचार, तसेच परवानगी न घेता करण्यात आलेले पेड प्रमोशन हे उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येणार असून, अशा प्रकरणांवर माध्यम कक्षामार्फत सतत लक्ष ठेवण्यात येणार आहे.
राजकीय पक्ष किंवा उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक ब्लॉग, संकेतस्थळ अथवा सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेला राजकीय स्वरूपाचा मजकूर, छायाचित्र, ऑडिओ किंवा व्हिडिओ हा राजकीय जाहिरात समजली जाणार नाही. त्यामुळे अशा पोस्टसाठी पूर्वप्रमाणिकरण आवश्यक नाही. मात्र, उमेदवारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटची सविस्तर माहिती उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात नमूद करणे बंधनकारक आहे.
याउलट बल्क एसएमएस, व्हिडिओ, तसेच सोशल मीडियावरील सशुल्क जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणिकरण करून घेणे आवश्यक राहणार आहे.
राजकीय जाहिरातींच्या प्रमाणिकरणासाठी महानगरपालिका स्तरावर पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष निवडणूक अधिकारी तथा आयुक्त असणार असून, जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. पोलीस आयुक्त, आचारसंहिता कक्ष प्रमुख व अतिरिक्त आयुक्त (सोमपा) हे समितीचे सदस्य आहेत.
उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी समितीकडे प्रमाणिकरणासाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांत त्यावर निर्णय देण्यात येईल. जाहिरातीत बदल सुचविण्याचा तसेच नियमानुसार नसल्यास प्रमाणिकरण नाकारण्याचा अधिकार समितीला देण्यात आला आहे. माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची दररोज बैठक घेतली जाणार आहे.
दरम्यान, माध्यम तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून, फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, एक्स (ट्विटर), यूट्यूब आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पथकांमार्फत सतत नजर ठेवली जात आहे. उमेदवारांच्या अधिकृत खात्यांसह अन्य कोणाकडून पेड प्रमोशन केले जात आहे का, याचीही तपासणी करण्यात येत आहे. तसेच पेड न्यूजच्या प्रकरणांवरही समिती लक्ष ठेवून आहे.
याशिवाय स्थानिक वृत्तवाहिन्या, खासगी एफएम रेडिओ केंद्रे व आकाशवाणीवरील जाहिरातींचेही निरीक्षण केले जाणार आहे. पूर्वप्रमाणिकरण न करता जाहिरात प्रसारित केल्यास संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ कळविण्यात येणार आहे.
उमेदवारांनी जाहिरात सादर करताना उमेदवार व पक्षाचे नाव, जाहिरात निर्मिती खर्च, प्रसारण खर्च व कालावधीची माहिती, तसेच जाहिरात मजकूर सीडी किंवा पेनड्राइव्हमध्ये सादर करणे आवश्यक आहे. स्वतंत्र व्यक्तीने जाहिरात दिली असल्यास त्यासोबत प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक राहणार आहे. कोणत्याही व्यक्तीस उमेदवार किंवा राजकीय पक्षाच्या वतीने विना प्रमाणिकरण जाहिरात देण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच मतदानाच्या दिवशी व त्याआधी मुद्रित माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठीही प्रमाणिकरण आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी नार्थकोट येथे स्थापन करण्यात आलेल्या मीडिया सेंटरशी उमेदवारांनी प्रत्यक्ष किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



