सोलापूर महापालिका निवडणुकीत दहशतीचे आरोप; भयमुक्त मतदानासाठी महाविकास आघाडीचे पोलिस आयुक्तांना निवेदन
सोलापूर महापालिका निवडणुकीत दहशतीचे आरोप; भयमुक्त मतदानासाठी महाविकास आघाडीचे पोलिस आयुक्तांना निवेदन
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक प्रक्रिया सुरू असताना शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत महाविकास आघाडीच्या वतीने पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांना निवेदन देण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि भयमुक्त वातावरणात पार पाडली जावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोलापूर शहरात नेहमीच खेळीमेळीच्या वातावरणात, कोणतीही कटुता न आणता निवडणुका लढविण्याची सुसंस्कृत परंपरा राहिली आहे. मात्र, सध्याच्या निवडणूक काळात सत्तेच्या बळावर भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांकडून या परंपरेला तडा दिला जात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
काल घडलेल्या खुनी हत्येच्या घटनेतून भाजप कार्यकर्त्यांची गुंड प्रवृत्ती समोर आली असून, निवडणूक काळात प्रत्येक प्रभागात उमेदवारांवर दबाव टाकणे, उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकावणे, मारहाण करणे तसेच विविध मार्गांनी दहशत निर्माण करणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे शहरात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना भयमुक्त वातावरणात फिरणे व प्रचार करणे अवघड झाले असल्याचा आरोपही करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने निवडणूक काळात कडक बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, तसेच कोणत्याही प्रकारच्या दबाव, हिंसाचार किंवा बेकायदेशीर प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे.
तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्याची झालेल्या हत्येप्रकरणी खुनाचा सूत्रधार आणि मारेकरी यांच्यातील मोबाईल संवादाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणीही यावेळी करण्यात आली.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष अजय दासरी, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, अशोक निंबर्गी, भारत जाधव, युसुफ मेजर, प्रताप चव्हाण, तिरूपती परकीपंडला, केशव इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे आणि महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.




