आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोधचा निकाल देऊ नका; राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेश
आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोधचा निकाल देऊ नका; राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेश
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. आयोगाच्या पूर्वमान्यतेशिवाय कोणत्याही उमेदवाराचा बिनविरोध विजयी निकाल जाहीर करू नये, असे स्पष्ट निर्देश आयोगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक प्रभागांत अर्ज माघारीनंतर एकच उमेदवार शिल्लक राहिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, अशा ठिकाणी तात्काळ बिनविरोध विजयी घोषित करण्याऐवजी आयोगाची मान्यता घेणे बंधनकारक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या या आदेशामागे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी दबाव, राजकीय समझोते किंवा तांत्रिक कारणांमुळे बिनविरोध प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या.
आयोगाच्या आदेशानुसार,
अर्ज माघारीनंतर एकच उमेदवार शिल्लक असला,
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही राज्य निवडणूक आयोगाची लेखी मान्यता मिळाल्याशिवाय बिनविरोध विजयी घोषित करता येणार नाही.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा इशाराही आयोगाने दिला आहे. त्यामुळे आता सर्व महानगरपालिकांतील निवडणूक यंत्रणांना अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
या आदेशामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही पक्षांनी या निर्णयाचे स्वागत करताना, बिनविरोध निवडणुकांचा वाढता पायंडा लोकशाहीसाठी घातक असल्याची भूमिका मांडली आहे. तर काही ठिकाणी उमेदवार व पक्षांना आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याने निवडणूक निकाल रखडण्याची शक्यता आहे.
एकूणच मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेवर कोणताही संशय निर्माण होऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हे कडक आदेश दिल्याचे स्पष्ट होत आहे.




