महाराष्ट्र

गडचिरोली पोलीस दलाला ३४ नव्या वाहनांचा ताफा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

गडचिरोली पोलीस दलाला ३४ नव्या वाहनांचा ताफा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

गडचिरोली (प्रबुध्द राज न्युज):- नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व प्रभावी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गडचिरोली पोलीस दलाला ३० स्कॉर्पिओ वाहने, २ बस व २ मोटारसायकल असा एकूण ३४ वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या नव्या वाहनांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
या वेळी राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम, जंगलमय व आदिवासी भाग मोठ्या प्रमाणावर असून, नक्षलविरोधी मोहिमा, गस्त, सर्च ऑपरेशन व आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यासाठी सक्षम वाहनांची नितांत गरज होती. नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्कॉर्पिओ, बस व मोटारसायकलमुळे पोलीस दलाची हालचालक्षमता वाढणार असून, नक्षलविरोधी कारवायांना मोठी गती मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात शांतता, सुरक्षा व विकासासाठी सक्षम पोलीस यंत्रणा अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक साधनसामग्री व वाहनबळ उपलब्ध करून देणे हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.”

या वाहनांमुळे दुर्गम भागातील पोलीस ठाण्यांना दळणवळण सुलभ होणार असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, तसेच पोलिसांचा प्रतिक्रिया वेळ (Response Time) कमी होण्यास मदत होणार आहे.

एकूणच, गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने हा वाहन ताफा म्हणजे नक्षलविरोधी लढ्याला मिळालेली मोठी ताकद ठरणार आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!