बीडहून आलेल्या टोळ्यांचा सोलापूरात धूमाकूळ… स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!
बीडहून आलेल्या टोळ्यांचा सोलापूरात धूमाकूळ… स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!
सोलापूर ((प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यातील एस.टी. स्टॅन्ड परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत गळ्यातील सोन्याचे दागिने कट करणे, मोटारसायकलवरून येत साखळी ओढून नेणे तसेच जबरी चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत नियोजनबद्ध, तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत जबरी चोरी 1, चैन स्नॅचिंग 4 आणि एस.टी. स्टॅन्ड चोरीचे 9 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणत तब्बल 21 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी मा. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांची विशेष बैठक घेऊन या गुन्ह्यांचे सखोल विश्लेषण केले. वाढत्या चोरी व स्नॅचिंगच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्या पथकाने संबंधित ठिकाणांवरील CCTV फुटेजचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण केले.
पोकों प्रमोद शिंपाळे यांनी फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न केले, तर पोहेकॉ सलीम बागवान यांनी एस.टी. स्टॅन्ड परिसरातील गुन्ह्यांची साखळी स्वरूपातील माहिती संकलित केली.

गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्या सोलापूर जिल्ह्यात चोरीसाठी येणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अक्कलकोट येथे सापळा रचून किरण आजिनाथ गायकवाड व राम पांडूरंग दुधाळ (रा. बीड) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी वैराग, अक्कलकोट एस.टी. स्टॅन्ड व अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन येथे गर्दीचा फायदा घेऊन ८ एस.टी. स्टॅन्ड चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली.
तसेच टेंभूर्णी एस.टी. स्टॅन्ड परिसरातून दत्ता उर्फ सोन्या गायकवाड, शाम उबाळे व बाळासाहेब गायकवाड या तिघांना अटक करून १ एस.टी. स्टॅन्ड चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला.
या सर्व आरोपींकडून 110 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (₹14.30 लाख) तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली एर्टिका कार (₹5 लाख) असा एकूण ₹19.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण 9 एस.टी. स्टॅन्ड चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
सपोनि विजय शिंदे यांच्या पथकाने माळशिरस बसस्थानकात सापळा रचून दुर्योधन उर्फ बबलू कांतीलाल चोरमले या सराईत आरोपीस अटक केली. त्याच्याकडून 1 जबरी चोरी व 4 सोनसाखळी स्नॅचिंग असे 5 गुन्हे उघड झाले असून 20 ग्रॅम सोन्याचे दागिने (₹2.60 लाख) हस्तगत करण्यात आले. त्याने साथीदारांसह सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, टेंभूर्णी, अकलुज व सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरीत्या पार पडली.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा गुन्हेगारांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा ठाम इशारा पोलिसांनी दिला आहे.


