क्राईम

दैनिक सुराज्यचे ज्येष्ठ पत्रकार बळीराम सर्वगोड (मामा) यांचे अपघाती निधन; पत्रकारितेला मोठा धक्का

दैनिक सुराज्यचे ज्येष्ठ पत्रकार बळीराम सर्वगोड (मामा) यांचे अपघाती निधन; पत्रकारितेला मोठा धक्का

सोलापूर (प्रबुद्ध राज न्यूज) :- दैनिक सुराज्यचे ज्येष्ठ, अनुभवी व अभ्यासू पत्रकार बळीराम सर्वगोड (मामा) यांचे काल रात्री बाळे येथील पुलावर झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार बांधव, जिल्हा परिषद प्रशासन, अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या असंख्य परिचितांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.

Oplus_16908288

बळीराम सर्वगोड यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक दशके निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले. पत्रकारितेची सुरुवात त्यांनी केसरी या नामांकित वृत्तपत्रातून केली होती. केसरीसारख्या अग्रगण्य दैनिकात काम करताना त्यांनी निर्भीड, लोकहिताची आणि वास्तव मांडणारी पत्रकारिता केली. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मान व पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

केसरी वृत्तपत्र बंद पडल्यानंतरही त्यांनी पत्रकारिता सोडली नाही. पुढे त्यांनी दैनिक सुराज्यमध्ये दीर्घकाळ काम केले आणि शेवटपर्यंत तेथेच कार्यरत होते. याशिवाय त्यांनी स्वतःचे ‘दैनिक जीवन सोपी’ हे वृत्तपत्र सुरू केले होते, तसेच ‘दैनिक जीवनशक्ती’ या माध्यमातूनही पत्रकारितेचा वारसा जपला. पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे, ही त्यांची ठाम भूमिका होती.

Oplus_16908288

गेल्या अनेक वर्षांपासून ते जिल्हा परिषद कार्यालयात पत्रकारिता करत होते. अभ्यासू, शांत, मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या साधेपणामुळेच अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार वर्गात ते “मामा” या प्रेमळ नावाने परिचित होते.

या दुर्दैवी घटनेला अधिक हृदयद्रावक किनार आहे. कालच संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत ते जिल्हा परिषद कार्यालयात उपस्थित होते. नेहमीप्रमाणे सहकाऱ्यांशी चर्चा, गप्पा सुरू होत्या. कार्यालयातून निघताना “मामा, चला चहा घेऊ” असे सांगितले असता, तोच चहा त्यांच्यासोबतचा शेवटचा चहा ठरेल, असे कोणालाच वाटले नव्हते. काही तासांतच त्यांच्या अपघाती निधनाची बातमी येताच सर्वांनाच मोठा धक्का बसला.

मामा यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालणारा, कोणताही भेदभाव न करणारा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. जिल्हा परिषद पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पत्रकारांसोबतच जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्गातही त्यांचा विशेष सन्मान होता.

Oplus_16908288

मामा यांच्यासोबतच्या आठवणी आज अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहेत. राजस्थानमधील ‘ओम शांती ’ या कार्यक्रमासाठी सलग दहा दिवस आम्ही मामा यांच्यासोबत होतो. त्या काळात त्यांचा साधेपणा, सकारात्मक विचार, आणि सगळ्यांना जोडून ठेवण्याची वृत्ती अधिक जवळून अनुभवता आली. ते नेहमीच सर्वांना समजून घेणारे, धीर देणारे आणि मार्गदर्शन करणारे होते.

कालच जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे उपसंचालक पवार साहेब जिल्हा परिषदेत आले असताना, पत्रकारांच्या टीमने मामा यांच्यासह त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. ती चर्चा देखील शेवटची ठरेल, असे कोणालाच वाटले नव्हते. त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.

Oplus_16908288

पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता लोकसेवेचे साधन मानणारे बळीराम सर्वगोड उर्फ मामा हे अनेक तरुण पत्रकारांसाठी प्रेरणास्थान होते. सत्य, निर्भीडता आणि माणुसकी यांचा समतोल राखणारी त्यांची पत्रकारिता कायम स्मरणात राहील.

त्यांच्या निधनाने एक अनुभवी पत्रकार, मार्गदर्शक आणि संवेदनशील माणूस समाजाने गमावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार, जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून हळहळ व्यक्त हकरत आहेत.

मामा यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🕯️

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!