महानगरपालिका निवडणुकीत मोठा निर्णय; जाहिरातींबाबत आयोगाचा कठोर इशारा

महानगरपालिका निवडणुकीत मोठा निर्णय; जाहिरातींबाबत आयोगाचा कठोर इशारा
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुरू असलेल्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता समाप्त होणार असून, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक, मुद्रित तसेच अन्य कोणत्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

नोंदणीकृत व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी निवडणूक प्रक्रियेतील नियम, आचारसंहिता आणि प्रचारावरील निर्बंधांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. त्यांनी सांगितले की, इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. मात्र, उमेदवाराचा सूचक आणि अनुमोदक यांची नावे उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे, त्याच प्रभागाच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
तसेच पक्षाच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवारालाही प्रत्येकी एक सूचक व एक अनुमोदक असणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवार एकापेक्षा अधिक प्रभागांतून नामनिर्देशनपत्र दाखल करू शकतो, मात्र एका प्रभागातील एका जागेसाठीच निवडणूक लढविता येईल, असेही त्यांनी सांगितले.
एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतात, अशी तरतूद असल्याची माहितीही आयोगाने दिली. या बैठकीदरम्यान राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व नियमबद्ध पार पडावी, यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व माध्यमांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.



