महाराष्ट्र

मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय (भाग–२) : अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी एक एकर जागा मंजूर; नगरपरिषद अधिनियमात मोठी सुधारणा

मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय (भाग–२) : अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी एक एकर जागा मंजूर; नगरपरिषद अधिनियमात मोठी सुधारणा

मुंबई (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत (भाग–२) सामाजिक व स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जागा मंजुरी तसेच नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षांच्या अधिकारांबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धाराशिव शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी धाराशिव नगरपरिषदेला दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर शासकीय जमीन विनामूल्य देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. धाराशिव शहरातील सर्व्हे क्र. ४२६ येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची ही जमीन पुतळा उभारणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि क्रांतिकारी कार्याचा सन्मान व्हावा, यासाठी पुतळा उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधी व विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतला असून, यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना आणि कार्याला योग्य गौरव मिळणार आहे.

दरम्यान, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कारभारात लोकशाही अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यानुसार थेट निवडून आलेल्या अध्यक्षास संबंधित नगरपरिषद किंवा नगरपंचायतीचे सदस्यत्व तसेच मताचा अधिकार देण्यात येणार आहे.

या सुधारणेनुसार,अध्यक्ष म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती आणि सदस्य म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती एकाच वेळी दोन्ही पदे धारण करू शकणार आहे. तसेच अध्यक्षाला सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार मिळणार असून, जर मतदानात मतांची बरोबरी झाली तर अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार राहणार आहे. या सुधारणेसाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

या निर्णयांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक स्पष्टता, स्थैर्य आणि लोकशाही प्रक्रिया बळकट होणार असून, सामाजिक व सांस्कृतिक वारशालाही चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!