सोलापूर उत्तर तहसील कार्यालयासमोर प्रहारचे अनोखे आंदोलन; लिंबू-गाजराच्या माळेतून भ्रष्टाचाराविरोधात निषेध
सोलापूर उत्तर तहसील कार्यालयासमोर प्रहारचे अनोखे आंदोलन; लिंबू-गाजराच्या माळेतून भ्रष्टाचाराविरोधात निषेध
सोलापूर (प्रबुध्द राज न्युज):- सोलापूर शहराला लागून असलेले उत्तर तहसील कार्यालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. प्रहारचे नेते अजित कुलकर्णी यांनी गळ्यात लिंबू आणि गाजराची माळ घालून थेट तहसीलदारांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला.

उत्तर तहसील कार्यालय हे यापूर्वीही विविध कारणांनी चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी याच कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांना अँटी करप्शन ब्युरोने ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या घटनेनंतरही कार्यालयातील कथित भ्रष्टाचार थांबलेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी बोलताना अजित कुलकर्णी यांनी सांगितले की, “एखाद्या कार्यालयातील दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी लाच घेताना सापडतो, याचा अर्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही.” उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात गोरगरीब नागरिक आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तहसील कार्यालयातील विविध कामांसाठी नागरिकांना अनावश्यक अडथळे, विलंब आणि आर्थिक मागण्या सहन कराव्या लागत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करावी तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी ठाम मागणी प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाने केली आहे.
या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र आंदोलन शांततेत पार पडले. आता प्रशासन या मागण्यांची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



