महाराष्ट्र

नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना पारदर्शक, सुलभ व जलद सेवा देण्याचे काम प्रभावीपणे सुरू असून, या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक तसेच अन्य प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकारी-कर्मचारी संघटनांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, मागण्या व अडचणी सविस्तरपणे ऐकून घेण्यात आल्या. त्यानंतर या प्रश्नांच्या प्रभावी व तातडीच्या सोडवणुकीसाठी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

यावेळी मंत्री बावनकुळे यांनी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती तसेच रिक्त पदांच्या भरती संदर्भातील कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सेवाप्रवेश नियमांबाबत सविस्तर माहिती घेऊन त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच महसूल विभागाच्या धर्तीवर मुद्रांक व नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्ययावत व आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी यशदा संस्थेमार्फत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबतही कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.

मुद्रांक व नोंदणी विभागाची काही कार्यालये सध्या खासगी इमारतींमध्ये कार्यरत असून, ती शासकीय जागेत स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने जिल्हानिहाय सविस्तर अहवाल तयार करून त्यानुसार आराखडा सादर करण्याच्या सूचनाही मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

या बैठकीमुळे नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, विभागाच्या कार्यक्षमतेत आणखी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!