गुटखा सापडला तर थेट निलंबन; एफडीए अधिकाऱ्यांना मंत्री झिरवाळ यांचा इशारा
गुटखा सापडला तर थेट निलंबन; एफडीए अधिकाऱ्यांना मंत्री झिरवाळ यांचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तत्सम अंमली आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही भागात बंदी असलेले पदार्थ आढळून आल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानंतर याबाबत एक कठोर परिपत्रक काढण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या क्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सामूहिक जबाबदार धरले जाणार आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनीही या कारवाईला अधिक धार देत राज्यातील सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. गुटखा, पानमसाला तसेच इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने होणारी विक्री, अवैध साठवणूक व वाहतूक यावर प्रभावी आणि तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
राज्यात गुटखा बंदी असूनही अनेक ठिकाणी गुप्तपणे विक्री सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर आता अन्न व औषध प्रशासन विभागाने थेट अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केल्याने, गुटखाविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांबरोबरच, दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई होणार असल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.



