भ्रष्टाचार रोखायचा असेल तर निलंबन नव्हे, बडतर्फ हवी; प्रशासनात भीती निर्माण करणाऱ्या कठोर कायद्याची गरज
भ्रष्टाचार रोखायचा असेल तर निलंबन नव्हे, बडतर्फ हवी; प्रशासनात भीती निर्माण करणाऱ्या कठोर कायद्याची गरज
सोलापूर (प्रबुध्द राज न्युज) :- सरकारी कार्यालयांमधील वाढता भ्रष्टाचार, लाचखोरी आणि सामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी सरकारने आता अधिक कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या (ACB) जाळ्यात एखादा अधिकारी अडकला, तर त्याला तात्काळ बडतर्फ करणे बंधनकारक करणारा कायदा सरकारने करावा, अशी ठाम भूमिका नागरिकांकडून मांडली जात आहे.
सध्याच्या व्यवस्थेत लाच घेताना अधिकारी पकडला गेल्यानंतर त्याला निलंबित केले जाते. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत असल्याने अनेक अधिकारी पुन्हा सेवेत येतात, काही निवृत्त होतात, तर काहींना फारशी कठोर शिक्षा होत नाही. परिणामी प्रशासनात “पकडले गेलो तरी फारसं काही होत नाही” अशी भावना निर्माण होत असून, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसत नाही, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.

जर सरकारने असा कठोर कायदा केला की लाच घेताना अटक झाली म्हणजे थेट बडतर्फी, तर प्रशासनात मोठा धक्का बसेल. यामुळे केवळ दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही, तर संपूर्ण यंत्रणेत भय आणि शिस्त निर्माण होईल. “नोकरी जाईल” ही भीती मनात असल्यास पुढे कोणीही लाच मागण्याची हिंमत करणार नाही, असा ठाम विश्वास या मागणीमागे व्यक्त केला जात आहे.
विशेषतः महसूल, पोलीस, नगरपालिकांमधील अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी ठिकाणी लाचखोरीचे प्रमाण अधिक असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. सामान्य माणसाची साधी कामेही लाचेविना होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत फक्त निलंबन नव्हे, तर बडतर्फीसारखी कठोर शिक्षा हाच एकमेव प्रभावी मार्ग असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, “कठोर कायदा झाला, तरच प्रशासन स्वच्छ होईल. अधिकारी लाच घ्यायला घाबरले पाहिजेत. भीती नसेल, तर कायद्याचा धाक राहणार नाही.”
या पार्श्वभूमीवर सरकारने कायद्यात बदल करून अँटी करप्शन प्रकरणांमध्ये शून्य सहनशीलता धोरण स्वीकारावे, अशी मागणी होत आहे. जर शासनाने वेळेत ठोस निर्णय घेतला, तर प्रशासन अधिक पारदर्शक, प्रामाणिक आणि जनतेला दिलासा देणारे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


