मोफत एसटी प्रवास कोणाला? ४३ प्रकारच्या सवलतींची सविस्तर माहिती समोर
मोफत एसटी प्रवास कोणाला? ४३ प्रकारच्या सवलतींची सविस्तर माहिती समोर
मुंबई (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (म.रा.मा.प.) यांच्यावतीने समाजातील विविध घटकांना प्रवास सुलभ व्हावा, आर्थिक दिलासा मिळावा आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी, या उद्देशाने प्रवासी भाड्यात तब्बल ४३ प्रकारच्या सवलती देण्यात येत आहेत. या सवलतींमध्ये मोफत प्रवासापासून ते ७५ टक्के, ६६.६७ टक्के व ५० टक्क्यांपर्यंतच्या भाडे सवलतींचा समावेश आहे.
स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे साथीदार, शहीद जवानांच्या वीरपत्नी, विविध राज्य व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, दिव्यांग, पत्रकार यांना १०० टक्के म्हणजेच पूर्णतः मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येत आहे. तसेच इतर अनेक घटकांना अंशतः सवलती लागू आहेत.

* विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६६.६७ टक्के सवलतीचा विद्यार्थी पास देण्यात येतो. त्याचप्रमाणे परीक्षा, शैक्षणिक सहली, कॅम्प, मोठ्या सुट्टीतील ये-जा यासाठी ५० टक्के भाडे सवलत दिली जाते. अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना १०० टक्के मोफत प्रवास उपलब्ध आहे.
* रुग्ण, दिव्यांग व विशेष घटकांना मदत
क्षयरोगी, कर्करोगी, कुष्ठरोगी, सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलिसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. अंध व अपंग व्यक्तींना साध्या व शिवशाही बसमध्ये ७० ते ७५ टक्के सवलत, तर त्यांच्या साथीदारांनाही सवलतीचा लाभ मिळतो.
* ज्येष्ठ नागरिक व सामाजिक सन्मान
राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना साध्या बसमध्ये ५० टक्के, शिवशाही बसमध्ये ४५ टक्के तर शिवशाही शयनयानमध्ये ३० टक्के सवलत दिली जाते. तसेच ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना पूर्णतः मोफत प्रवास देण्यात येतो.
* पुरस्कारप्राप्त व मान्यवरांसाठी मोफत प्रवास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण, आदिवासी सेवक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विविध क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू, अधिस्विकृतीधारक पत्रकार, आजी-माजी आमदार, तसेच आषाढी व कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान मिळालेले वारकरी दाम्पत्य यांना १०० टक्के प्रवास सवलत देण्यात येते.
म.रा.मा.प. महामंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असून, एसटी ही केवळ वाहतूक सेवा न राहता सामाजिक बांधिलकी जपणारी जीवनवाहिनी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



