रेल्वे ब्रिज पाडणार; पर्यायी रस्ता सुरू करा — आयुक्तांचा रेल्वेला स्पष्ट आदेश
सोलापूर(प्रबुध्द राज न्युज):- सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत, नागरिकांच्या सोयीसाठी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला.
भैया चौक परिसरातील रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असून, या दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी ५४ मीटर रस्ता सुरू करण्याबाबत आज मध्य रेल्वे सोलापूरचे मंडल रेल प्रबंधक डॉ. सुजीत मिश्रा यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी “ब्रिज पाडण्याआधी नागरिकांना गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग तात्काळ सुरू करा,” असा स्पष्ट निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.
दरम्यान, टिकेकरवाडी रेल्वे स्टेशनच्या विस्तारिकरणाबाबतही महत्त्वाची चर्चा झाली. या स्टेशनला जोडणारा अप्रोच रोड कुमठा गाव व होटगी रोडशी जोडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.

यानंतर आयुक्तांनी ६ कामना परिसरातील नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांची पाहणी केली. या कामामुळे परिसरातील पावसाचे पाणी सहजपणे नाल्यातून वाहून जाईल आणि पाणी साचण्याची समस्या कायमची दूर होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित एडवेंचर पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. आयुक्तांनी या पार्कला भेट देऊन सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि देखभाल तपासली. “पार्क परिसर स्वच्छ, आकर्षक आणि सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी सातत्याने देखरेख ठेवावी,” अशा सूचना त्यांनी दिल्या.

त्यानंतर त्यांनी रंगभवन प्लाझा येथे सुरू असलेल्या स्वच्छता, प्रकाशयोजना आणि सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी करून अहवाल घेतला.
समाचार चौकातील सुशोभीकरणाच्या कामांचीही पाहणी करण्यात आली. येथे सुंदर सीटिंग एरिया, गार्डन, लाईटिंग आदी सुविधा उभारल्या जात आहेत. “हा चौक आकर्षक व नागरिकांना विश्रांतीसाठी योग्य ठिकाण व्हावा,” असे आयुक्तांनी नमूद केले.
या सर्व पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी अधिकारी वर्गाला “कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा, तसेच परिसरातील अतिक्रमण तातडीने दूर करा,” अशा सूचना दिल्या.
या वेळी उपायुक्त आशिष लोकरे, Sr. DEN (Co) एस. एच. मलभागे, व. मंडल वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील, व. मंडल परिचालन प्रबंधक ब्रजेश राय, Sr. DME रामलाल प्यासे, AEN भोसले, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर, सागर कुरसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.








