सोलापूर

झेडपी उद्यानातील शिवरायांच्या पुतळ्याला नवे वैभव; सुशोभीकरणासाठी २ कोटींचा आराखडा तयार

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची संकल्पना, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा पाठपुरावा; शिवराय उद्यानाचे बदलणार रूप

झेडपी उद्यानातील शिवरायांच्या पुतळ्याला नवे वैभव; सुशोभीकरणासाठी २ कोटींचा आराखडा तयार

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची संकल्पना, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा पाठपुरावा; शिवराय उद्यानाचे बदलणार रूप

सोलापूर : सोलापूर शहरातील रंगभवन चौक येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे लवकरच नव्या स्वरूपात रुपांतर होणार आहे. उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण आणि संपूर्ण परिसराच्या विकासासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थापनेच्या काळात म्हणजे १९६० साली या उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. या उद्यानात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती उभा पुतळा हा सोलापूर शहरातील पहिल्या वैशिष्ट्यपूर्ण शिवपुतळ्यांपैकी एक मानला जातो. मात्र कालांतराने पुतळ्याभोवती वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे हा ऐतिहासिक पुतळा नागरिकांना स्पष्टपणे दिसत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या उद्यानाचे भव्य सुशोभीकरण करण्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने सविस्तर विकास आराखडा तयार केला असून तो पालकमंत्र्यांसमोर सादर करण्यात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनानंतर हे काम हाती घेऊन पुढील वर्षभरात म्हणजेच ६ जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सुशोभीकरण आराखड्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढवून तो अधिक आकर्षक आणि दिमाखदार करण्यात येणार आहे. तसेच पुतळा तिन्ही बाजूंनी स्पष्टपणे दिसेल, अशा पद्धतीने परिसराची रचना केली जाणार आहे. विशेष म्हणजे उद्यानातील एकही झाड तोडण्यात येणार नसून केवळ वाढलेल्या व दृष्टीआड करणाऱ्या फांद्यांची छाटणी केली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करत उद्यानाचे सौंदर्य अधिक खुलविण्यावर भर दिला जाणार आहे.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी पुतळ्याभोवती शिवकालीन शस्त्रे, वस्तू, प्रतिकृती आणि ऐतिहासिक माहितीचा संग्रह उभारण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. यामुळे हे उद्यान केवळ विरंगुळ्याचे ठिकाण न राहता इतिहास आणि प्रेरणेचे केंद्र बनण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शिवप्रेमींसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या उद्यानाचा कायापालट होणार असून, सोलापूर शहराच्या वैभवात आणखी भर पडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!