“तुम्ही बैठकीला आलात का फिरायला आलात?” – डीपीडीसी बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे संतप्त
“तुम्ही बैठकीला आलात का फिरायला आलात?” – डीपीडीसी बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे संतप्त
सोलापूर :- दीर्घ अंतरानंतर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) बैठकीत विविध विकासकामांसह शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरे होते. यावेळी त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
बैठकीदरम्यान माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये जनावरे वाहून गेली असून, प्रभावित शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, अशी बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. या विषयावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
या मुद्द्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले. संबंधित अधिकाऱ्यांनी १६५ गावांमध्ये अतिवृष्टी झाली असताना केवळ १६५ जनावरे वाहून गेल्याची माहिती दिल्याने पालकमंत्री संतप्त झाले.
“तुम्ही बैठकीला आलात का फिरायला आलात? तुम्हाला तुमच्या खात्याची अचूक माहिती नाही का?” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत कडक शब्दांत सुनावले. तसेच शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, बैठकीत वाकाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत तक्रार मांडण्यात आली. संबंधित अधिकारी उपचारासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप उपस्थित करण्यात आला. या गंभीर प्रकाराची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.





