पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी कोटींची बक्षिसे; आरोग्य व्यवस्थेला चालना

पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी कोटींची बक्षिसे; आरोग्य व्यवस्थेला चालना
मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यात ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या उद्देशाने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. हे अभियान दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येणार असून, आरोग्यविषयक विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आरोग्यसंपन्न ग्राम म्हणून मानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येतील. प्राथमिक आरोग्य सेवा, स्वच्छता, पोषण, माता-बाल आरोग्य, संसर्गजन्य रोग नियंत्रण, लसीकरण आणि जनजागृती यांसारख्या घटकांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच पंचायत समिती स्तरावर पहिल्या तीन क्रमांकांसाठी अनुक्रमे २ कोटी, १.५ कोटी व १.२५ कोटी रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.
याचप्रमाणे जिल्हा परिषद स्तरावर पहिल्या तीन क्रमांकांसाठी अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी व २ कोटी रुपये इतका पुरस्कार दिला जाणार आहे. या संपूर्ण अभियानासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी ८० कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, तसेच ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर आरोग्यविषयक स्पर्धात्मकता वाढून स्वच्छ, निरोगी व सक्षम गावांची निर्मिती होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





