बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं आज (मंगळवार) मुंबईत निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होते. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर वृद्धापकाळामुळे त्यांनी प्राण सोडले.धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या तब्येतीत चढ-उतार सुरू होते. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने काही दिवसांपूर्वी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला डॉक्टरांनी उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं होतं, मात्र पुढील काही दिवसांत प्रकृती आणखी खालावली. अखेर त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, पण उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.
अखेरच्या क्षणी संपूर्ण कुटुंब सोबत
धर्मेंद्र यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचे सर्व कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित होते. अभिनेता सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल यांच्यासह संपूर्ण देओल कुटुंब त्यांच्याभोवती होते. तसेच अनेक बॉलिवूड कलाकार, जसे शाहरुख खान, सलमान खान, जावेद अख्तर यांनीही रुग्णालयात येऊन श्रद्धांजली वाहिली.

धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यात झाला. त्यांनी शिक्षण फगवाडा येथील आर्य हायस्कूलमध्ये घेतले. शिक्षणानंतर काही काळ रेल्वे खात्यात क्लर्क म्हणून नोकरी केली. मात्र अभिनयाची ओढ त्यांना चित्रपटसृष्टीकडे खेचून घेऊन आली. त्यांनी फिल्मफेअर टॅलेंट स्पर्धेत भाग घेतला आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याला नवा दिशा मिळाली.१९६० साली धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागले.धर्मेंद्र यांच्या अभिनयाने सजलेले ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘चुपके चुपके’, ‘कटी पतंग’, ‘शोले’तील वीरू, तसेच ‘धरम वीर’, ‘यादों की बारात’ हे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
त्यांनी आपल्या अभिनयात रोमँटिक हिरो, अॅक्शन स्टार आणि कॉमेडी कलाकार ही तिन्ही रूपं ताकदीनं साकारली.त्यांना २०१२ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
बॉलिवूडमध्ये शोककळा
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक नामवंत कलाकार आणि दिग्दर्शकांनी श्रद्धांजली वाहताना म्हटलं —> “धर्मेंद्र फक्त अभिनेता नव्हते, तर भावना होते. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे.”
धrर्मेंद्र यांच्या जाण्याने बॉलिवूडने आपला सर्वात प्रेमळ, दमदार आणि प्रेक्षकप्रिय ‘ही-मॅन’ गमावला आहे. त्यांचं योगदान पुढील अनेक दशकं सिनेसृष्टीत स्मरणात राहील.








