Prabuddha Raj

Latest Marathi News

पुल्ली कन्या प्रशालेत क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा

सोलापूर (प्रतिनिधी):- अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सक्षम राहावे, संघभावना व स्पर्धात्मकता वाढावी यासाठी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ. भू. म. पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. क्रीडांगणाचे पूजन करून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.

क्रीडा सप्ताहात लंगडी, खो-खो, थ्रो बॉल, डॉजबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धांचा समावेश करण्यात आला. या स्पर्धांमध्ये ५ वी ते १० वीच्या एकूण ९०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाला प्राचार्या गीताताई सादुल, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम तसेच पर्यवेक्षक परमेश्वर बाबळसुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रसाद कर्रे यांनी स्पर्धांचे नियोजन व अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या प्रसंगी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

स्पर्धेत विजयी ठरलेल्या संघांचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मालिकार्जुन सरगम तसेच खजिनदार गोवर्धन कमटम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

क्रीडा सप्ताहामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह आणि क्रीडाप्रेमाची भावना निर्माण झाल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले.