महाराष्ट्र

सोलापूर मनपात भाजपाची एकहाती सत्ता; मुख्यमंत्री फडणवीसांकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे अभिनंदन

सोलापूर मनपात भाजपाची एकहाती सत्ता; मुख्यमंत्री फडणवीसांकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे अभिनंदन

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे खास पेढा भरवून अभिनंदन केले. या विजयामागे परिश्रम घेणाऱ्या भाजपाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनापासून कौतुक करत सोलापूरच्या विकासाला पुढील काळात अधिक गती देण्याचा शब्द दिला.

पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहरातील अनेक वर्षे रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन त्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मनपेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या महत्त्वाच्या प्रश्नांना गती दिली.

शहराच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन दरबारी ठोस भूमिका घेत निधी मंजूर करून घेण्यात आला. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विमानसेवेचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मार्गी लावण्यात आला. विमानसेवा सुरू होणे, आयटी पार्कला मंजुरी मिळणे आणि एमआयडीसीतील सुविधांचा विकास या बाबींमुळे सोलापूरच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नव्या सहकाऱ्यांना सोबत घेत जुन्या-नव्या नेतृत्वाचा समतोल साधत प्रभावी रणनीती आखली. आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे तसेच शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या सक्रिय सहभागामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली आणि त्याचा थेट परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला.

प्रचार काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सोलापूरमध्ये सभा घेऊन शहराच्या विकासाचा स्पष्ट रोडमॅप जनतेसमोर मांडला. भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवत सोलापूरकरांनी भाजपाला भरघोस मतांनी विजयी केले आणि मनपेत एकहाती सत्ता बहाल केली.

निवडणुकीनंतर शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सोलापूरकरांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही. आगामी काळात विस्तारित विमानसेवा, समतोल पाणीपुरवठा योजना, आयटी पार्क, एमआयडीसीतील आधुनिक सुविधा आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा सरकार पूर्ण ताकदीने काम करणार आहे.

सोलापूर महानगरपालिकेवरील भाजपाची एकहाती सत्ता ही विकासाला दिलेली जनतेची पावती असून, येणाऱ्या काळात सोलापूर शहर महाराष्ट्रातील एक आदर्श शहर म्हणून उभे राहील, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!