नवी दिल्ली :-राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. एका पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, स्फोटानंतर मुंबई, पुणे, बेंगळुरू, हैदराबादसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, काही क्षणातच कारने पेट घेतला आणि शेजारील दोन ते तीन वाहनेही आगीत सापडली. स्फोटानंतर तीन ते चार वाहने पूर्णपणे जळून खाक झाली असून, परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. पोलिस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. मात्र, स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज सुमारे 200 ते 300 मीटर अंतरावर ऐकू गेला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, लाल किल्ला परिसर संपूर्णपणे सील करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेसह दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि एनआयए (NIA)चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
देशभरातील रेल्वे स्थानके, विमानतळ, मॉल्स आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीवरच अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे.
या भीषण घटनेनंतर देशात पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, तपास यंत्रणा स्फोटामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.







