माता रमाईंच्या जयंतीनिमित्त ३९ कोटींची साडी; गोल्डन मॅन रोहित पिसाळ यांची अनोखी मानवंदना

माता रमाईंच्या जयंतीनिमित्त ३९ कोटींची साडी; गोल्डन मॅन रोहित पिसाळ यांची अनोखी मानवंदना
मुंबई (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक अनोखा आणि भव्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळखले जाणारे उद्योजक रोहित पिसाळ यांनी माता रमाईंच्या स्मरणार्थ तब्बल ३९ कोटी रुपये मूल्याची विशेष साडी तयार करण्याचा संकल्प केला आहे.

या साडीच्या निर्मितीत सुमारे ३३ कोटी रुपयांचे हिरे आणि दोन किलो सोन्याचा वापर करण्यात येत आहे. संपूर्ण साडीवर सोन्याचा मुलामा देण्यात येत असून, माता रमाईंच्या कपाळावरील कुंकवाच्या जागी हिऱ्यांची विशेष जडणघडण करण्यात येणार आहे. हा उपक्रम माता रमाबाईंच्या त्याग, संघर्ष आणि प्रेरणादायी जीवनाला अभिवादन म्हणून साकारला जात असल्याचे रोहित पिसाळ यांनी सांगितले.
“जगातील प्रत्येक मुलगा आपल्या आईसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या कमाईतून माझ्या रमाई माऊलींसाठी ही भेट देण्याचा मी निश्चय केला आहे,” असे पिसाळ यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
ही साडी तयार झाल्यानंतर एक महिनाभर भारतभर प्रदर्शित केली जाणार असून, त्यानंतर लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसमध्ये प्रदर्शनासाठी देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले. बाबासाहेबांनी परदेशात शिक्षण घेत असताना रमाई मातेने मोठा त्याग केला आणि अत्यंत हलाखीत दिवस काढले. त्यांच्या या योगदानाला आदरांजली म्हणून हा उपक्रम राबविला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
*कोण आहेत ‘गोल्डन मॅन’ रोहित पिसाळ?*
रोहित पोपट पिसाळ हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक असून, ‘गोल्डन मॅन’ म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. ते पाण्याखालील सोन्याच्या खाणकामाशी संबंधित व्यवसाय करतात तसेच ‘क्षुशा फॅशन हाऊस’ या ब्रँडचे संस्थापक आहेत. आयुष्यातील कठीण आजारावर मात करत त्यांनी इंडोनेशियामध्ये सोन्याच्या खाण प्रकल्पांची अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या जिद्दी आणि नवकल्पनांमुळे ते आज अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत.
माता रमाबाई आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनाला अभिवादन करणारा हा उपक्रम सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात असून, समाजातून त्याचे स्वागत होत आहे.





