तक्रार केली म्हणून शिक्षकावरच कारवाई?” – जिल्हा परिषद गेटसमोर मुख्याध्यापकांचे अर्धनग्न उपोषण
“अर्धनग्न उपोषणानंतरही प्रशासन झोपेत?” - जिल्हा परिषद गेटवर मुख्याध्यापकाचा आक्रोश
तक्रार केली म्हणून शिक्षकावरच कारवाई?” – जिल्हा परिषद गेटसमोर मुख्याध्यापकांचे अर्धनग्न उपोषण
“अर्धनग्न उपोषणानंतरही प्रशासन झोपेत?” – जिल्हा परिषद गेटवर मुख्याध्यापकाचा आक्रोश
सोलापूर :- अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्यावर गंभीर आरोप करत मागील महिनाभरापासून सुरू केलेले उपोषण आता अर्धनग्न आंदोलनात परिवर्तित झाले आहे. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कट्टीमनी यांनी आरोप केला आहे की, अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी अरबाळे यांनी विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून शिक्षकांच्या बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या केल्या. या प्रकरणाची तक्रार त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती.
या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. संबंधित समितीने अरबळे यांच्यावर ठपका ठेवला असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
मात्र, तक्रार केल्यानंतर परिस्थिती उलटल्याचा आरोप करत कट्टीमनी म्हणतात त्यांच्या विरोधात विनाचौकशी अहवाल सादर करण्यात आला
गटविकास अधिकारी कवितके यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली
निलंबन कालावधी संपल्यानंतरही पुनर्नियुक्ती टाळली गेली
यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कट्टीमनी यांनी मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार केल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे दुसऱ्या शाळेत नियुक्ती दिल्याचा आरोप आहे.
मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव ही नियुक्ती नाकारण्यात आली असल्याचे कट्टीमनी यांनी स्पष्ट केले.
मैंदर्गी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेतील विद्यार्थिनींना कट्टीमनी यांनी स्वतःच्या खर्चातून सलग दोन वर्ष विमान सहल घडवून आणली होती.
या उपक्रमाची महाराष्ट्रासह कर्नाटकातही मोठी चर्चा झाली होती. कर्नाटक शासनाने त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेतली होती.

गेल्या एक महिन्यापासून जिल्हा परिषद सोलापूरच्या गेटसमोर उपोषण सुरू असताना, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कट्टीमनी यांनी आता
*अर्धनग्न अवस्थेत उपोषण सुरू केले आहे*
यामुळे जिल्हा परिषद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी शाळांना “ज्ञानमंदिर” बनवण्याची घोषणा केलेली असताना, त्याच ठिकाणी एका मुख्याध्यापकाला न्यायासाठी अशा प्रकारे आंदोलन करावे लागत असल्याने प्रशासनावर टीका होत आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत,
“शिक्षकाला अशी वेळ का आली?”
“प्रशासन दुर्लक्ष करत आहे का?”
“अर्धनग्न आंदोलनाला जबाबदार कोण?”
या प्रकरणामुळे जिल्हा परिषद प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यायासाठी लढणाऱ्या एका मुख्याध्यापकाची ही कहाणी सध्या सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.




