उत्तर सोलापूरच्या पाणीप्रश्नांसाठी इंद्रजित पवार आक्रमक; उजनी कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे गावागावच्या समस्यांचा पाढा

उत्तर सोलापूरच्या पाणीप्रश्नांसाठी इंद्रजित पवार आक्रमक; उजनी कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे गावागावच्या समस्यांचा पाढा
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा, कालव्यांमधून मिळणारे पाणी आणि शेतकऱ्यांच्या सिंचनासंदर्भातील प्रश्नांवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पुढाकार घेत उजनी कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. गावागावातील पाण्याच्या समस्या तातडीने सोडवून नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्र. ८, सोलापूर मा. म्याकल साहेब यांची भेट घेऊन इंद्रजित पवार यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांतील पाणीप्रश्न सविस्तरपणे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी, कालव्यांमधून अपेक्षित पाणी न मिळणे, शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्या तसेच नागरिकांच्या पाण्याशी संबंधित प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांचा शेती व नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असताना, पाण्याच्या उपलब्धतेशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतकरी आणि ग्रामस्थांवर होतो. त्यामुळे संबंधित प्रश्नांकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका इंद्रजित पवार यांनी मांडली.

गावनिहाय पाणीप्रश्नांची माहिती घेऊन संबंधित यंत्रणेमार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, तसेच नागरिकांना पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या सर्व प्रश्नांवर कार्यकारी अभियंता म्याकल साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, संबंधित समस्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी भाजपा उत्तर तालुका अध्यक्ष संभाजी दडे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, पंचायत समिती उपसभापती सुनील भोसले, अकोलेकाटीच्या सरपंच अंजली क्षीरसागर, गुळवंचीचे सरपंच सुनील जाधव, अरुण बारसकर, राजाराम गरड, अविनाश शिरसट यांच्यासह शेतकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
उत्तर सोलापूरच्या पाणीप्रश्नावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी थेट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याने, आगामी काळात या समस्यांवर कोणती कार्यवाही होते, याकडे तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



