जिल्हा परिषद सभागृहातील शिस्तीचा मुद्दा ऐरणीवर; दोन औषध निर्माण अधिकाऱ्यांकडून खुलासा घेणार
अध्यक्ष दीपक वैद्य गंभीर; परवानगीशिवाय कोणीही बोलणार नाही, रीलस्टारनाही पुढील सभेपासून प्रवेशबंदीची शक्यता

जिल्हा परिषद सभागृहातील शिस्तीचा मुद्दा ऐरणीवर; दोन औषध निर्माण अधिकाऱ्यांकडून खुलासा घेणार
अध्यक्ष दीपक वैद्य गंभीर; परवानगीशिवाय कोणीही बोलणार नाही, रीलस्टारनाही पुढील सभेपासून प्रवेशबंदीची शक्यता
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरून निर्माण झालेल्या गोंधळाची जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी गंभीर दखल घेतली आहे. सभागृहात उपस्थित असलेल्या औषध निर्माण अधिकारी लीना पुजारी व पाटील यांच्याकडून या प्रकाराबाबत खुलासा घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष वैद्य यांनी दिली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेपूर्वीच आयत्या वेळच्या विषयांसह सभेच्या कामकाजाबाबत विभागप्रमुख व सदस्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. सभागृहातील कामकाजाचे नियंत्रण अध्यक्षांकडे असते. कोणत्या सदस्याने बोलायचे, कोणत्या अधिकाऱ्याने प्रश्नाचे उत्तर द्यायचे आणि कोणाला सभागृहात उपस्थित राहण्याची परवानगी द्यायची, याबाबत अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असते.
• प्रश्न आरोग्य विभागाचा, पण उत्तर देण्यासाठी कर्मचारी उठल्या •
सभेदरम्यान सदस्य आदिनाथ देशमुख यांनी लसीकरणासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपरवाड उभे राहिले. मात्र, त्याचवेळी औषध निर्माण अधिकारी लीना पुजारी यांनी अध्यक्ष किंवा संबंधित विभागप्रमुखांची स्वतंत्र परवानगी न घेता उठून देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास सुरुवात केल्याचे समोर आले.
यानंतर देशमुख यांनी याबाबत जाब विचारला. त्यावरून सभागृहात काही काळ सवाल-जवाब झाले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा परिषद सभागृहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आणि सदस्यांच्या प्रश्नांना थेट उत्तर देण्याच्या पद्धतीचा मुद्दा चर्चेत आला.
या प्रकाराबाबत विचारणा केली असता संबंधित औषध निर्माण अधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांनी आपल्याला बोलावले होते, असे सांगितल्याचे समोर आले आहे. मात्र, सभेचे कामकाज सुरू असताना ही बाब अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली नाही. त्यातच सभेचे सचिवही प्रभारी असल्याने सभागृहातील कामकाजाच्या शिस्तीचा प्रश्न अधिक चर्चेत आला.
सभागृहातील नियमांनुसार संबंधित प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एखाद्या विभागातील कर्मचाऱ्याकडून माहिती घेण्याची आवश्यकता भासल्यास त्यांना सभागृहाबाहेरून बोलावून माहिती घेता येते. मात्र, त्यांना सभागृहात बसण्याची परवानगी नसते, अशी भूमिका अध्यक्ष वैद्य यांनी स्पष्ट केली.
“सभेत कर्मचाऱ्यांना बसण्यास परवानगी नसते, हे मला माहीत नव्हते. सचिवांकडून याबाबत माहिती घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागविला जाईल,” असे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी स्पष्ट केले.
• ‘मी उत्तर द्या’ म्हटल्याशिवाय कोणीही बोलणार नाही
जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि सदस्यांसाठी हा नवीन कार्यकाळ असल्याने सभागृहातील कामकाजाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. यापुढे सदस्य, सभापती, अधिकारी किंवा कर्मचारी यांनी अध्यक्षांची परवानगी घेतल्याशिवाय बोलू नये, अशी स्पष्ट सूचना देण्यात येणार आहे.
“मी उत्तर द्या असे सांगितल्याशिवाय कोणालाही बोलू दिले जाणार नाही,” अशी भूमिका अध्यक्ष वैद्य यांनी घेतली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद सभागृहातील आणखी एका प्रकाराची अध्यक्षांनी दखल घेतली आहे. सभेचे कामकाज सुरू असताना काही जण सभागृहात फिरून मोबाईलवर चित्रीकरण करताना दिसून येतात. सोशल मीडियासाठी रील तयार करणाऱ्या अशा व्यक्तींमुळे सभागृहातील कामकाजात व्यत्यय येण्याची शक्यता असल्याने पुढील सभेपासून त्यांच्यावरही निर्बंध घालण्यात येणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
सभागृह हे प्रशासकीय कामकाजाचे ठिकाण असल्याने तेथे नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढील सर्वसाधारण सभेत सभागृहातील प्रवेश, उपस्थिती, बोलण्याची पद्धत आणि चित्रीकरणाबाबत अधिक कडक नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी जिल्हा परिषद व पंचायत राज संस्थांच्या सभांच्या कामकाजाबाबत असलेल्या नियमांचा शोध घेतला. राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या सभांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची पद्धत याबाबतची माहितीही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.
यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहातील शिस्त, अध्यक्षांचे अधिकार आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
• पुढील सभेकडे लक्ष •
नुकत्याच झालेल्या सभेत घडलेल्या प्रकारानंतर अध्यक्ष दीपक वैद्य यांनी आता सभागृहातील कामकाज अधिक शिस्तबद्ध करण्याची भूमिका घेतली आहे. संबंधित दोन औषध निर्माण अधिकाऱ्यांकडून खुलासा घेण्यात येणार असून, पुढील सभेत कोणालाही अध्यक्षांच्या परवानगीशिवाय बोलण्यास मज्जाव केला जाणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत या नियमांची अंमलबजावणी कशी होते आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या खुलाशावर काय निर्णय घेतला जातो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



