सोलापूर

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पादुका पूजन, प्रशासनाकडून पुष्पवृष्टी

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पादुका पूजन, प्रशासनाकडून पुष्पवृष्टी

पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे रविवारी धर्मपुरी येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, “ज्ञानोबा माऊली… तुकाराम”च्या अखंड जयघोषात पालखीचे धर्मपुरीत आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

यावेळी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन विधिवत पूजन केले. तसेच पादुकांना पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनीही पादुकांचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही अंतर पालखीसोबत पायी चालत वारकरी संप्रदायाविषयीचा आपला भाव व्यक्त केला.

धर्मपुरी पालखीतळावर हजारो वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. “राम कृष्ण हरी”, “ज्ञानोबा माऊली… तुकाराम” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. पोलीस बँड पथकाने भक्तिमय धून सादर करून पालखीचे उत्साहात स्वागत केले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. भावार्थ देखणे महाराज यांचा सत्कार करण्यात आला.

या स्वागत सोहळ्यास आमदार उत्तम जानकर, सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारकऱ्यांसाठी प्रशासनाची चोख तयारी

धर्मपुरी पालखीतळावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने सर्वंकष नियोजन केले आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे, अखंड वीजपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था आणि वैद्यकीय सेवा यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात आले असून वारकऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने हिरकणी कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच दिवसभराच्या पायी प्रवासाने थकलेल्या वारकऱ्यांना आराम मिळावा यासाठी फूट मसाज मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हजारो भाविक त्याचा लाभ घेत आहेत. याशिवाय आपत्कालीन आरोग्य सेवा तत्काळ उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्यदूत आणि आरोग्य बाईक पथके तैनात करण्यात आली आहेत.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर धर्मपुरी येथे उभारण्यात आलेल्या या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे वारकऱ्यांना सुरक्षित, सुलभ आणि आरोग्यदायी सुविधा मिळत असून जिल्हा प्रशासनाच्या या तयारीचे भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!