वारकऱ्यांच्या पंगतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; साधेपणाने जिंकली भाविकांची मने
व्हीआयपी प्रोटोकॉलला फाटा देत वारकऱ्यांसोबत घेतले महाप्रसादाचे भोजन; पंढरपुरात साधेपणाची सर्वत्र चर्चा

वारकऱ्यांच्या पंगतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; साधेपणाने जिंकली भाविकांची मने
व्हीआयपी प्रोटोकॉलला फाटा देत वारकऱ्यांसोबत घेतले महाप्रसादाचे भोजन; पंढरपुरात साधेपणाची सर्वत्र चर्चा
पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या साधेपणाचा प्रत्यय देत वारकरी भक्तांच्या पंक्तीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. वारकरी भक्त निवासाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर त्यांनी कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल न ठेवता थेट सामान्य वारकऱ्यांसोबत भोजन केले. त्यांच्या या कृतीचे वारकरी, नागरिक आणि उपस्थित भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

वारकरी भक्त निवासाच्या उद्घाटनानंतर स्वतंत्र व्यवस्था स्वीकारण्याऐवजी सुनेत्रा पवार यांनी सामान्य वारकऱ्यांप्रमाणेच पंगतीत स्थान घेतले. पत्रावळीवर वाढण्यात आलेल्या पारंपरिक महाप्रसादाचा त्यांनी इतर भाविकांप्रमाणेच आनंद घेतला. त्यांच्या या साध्या आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे उपस्थित वारकरी सुखद आश्चर्यचकित झाले.
आषाढी वारीत लाखो भाविक सहभागी होत असताना लोकप्रतिनिधींनीही वारकऱ्यांमध्ये मिसळून त्यांच्या भावना समजून घ्याव्यात, असा संदेश त्यांच्या या कृतीतून मिळाल्याची भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली. “सत्तेच्या सर्वोच्च पदावर असतानाही साधेपणा कायम ठेवणे हीच खरी लोकाभिमुखता आहे,” अशा प्रतिक्रिया वारकरी भक्तांकडून व्यक्त करण्यात आल्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दाखविलेल्या या साधेपणामुळे पंढरपूरच्या वारीत त्यांच्या वागणुकीची सर्वत्र चर्चा रंगली असून, वारकरी संप्रदायातील भाविकांकडून त्यांच्या या कृतीचे मनापासून कौतुक केले जात आहे. त्यांच्या या सहभागामुळे वारीतील समता, साधेपणा आणि भक्तिभावाचा संदेश अधिक अधोरेखित झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.



