कृषीदिनानिमित्त कारंबा येथे प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव; १ जुलै रोजी कृषी पुरस्कार वितरण सोहळा
भाजप ओबीसी मोर्चा (सोलापूर पूर्व) आयोजित कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान; भव्य सभागृहाचेही लोकार्पण

कृषीदिनानिमित्त कारंबा येथे प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव; १ जुलै रोजी कृषी पुरस्कार वितरण सोहळा
भाजप ओबीसी मोर्चा (सोलापूर पूर्व) आयोजित कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान; भव्य सभागृहाचेही लोकार्पण
सोलापूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषीदिनाचे औचित्य साधून भाजप ओबीसी मोर्चा (सोलापूर पूर्व) यांच्या वतीने १ जुलै रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण व प्रयोगशील कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार असल्याची माहिती भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक अभिमन्यू सुतार यांनी दिली.

कारंबा येथील बहिर्जे नगर येथे सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, सोलापूर बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते, जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी बोराडे, उपसभापती सुनील भोसले, पंचायत समिती सदस्या सुनीता बारसकर, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष संभाजी दडे तसेच उद्योजक नागनाथ बन्ने हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात कृषी आणि कृषीपूरक व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘कृषी पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य सभागृहाचे लोकार्पण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावर्षीच्या पुरस्कारासाठी विविध श्रेणींतील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. आदर्श शेतकरी म्हणून विजय भोरे, आदर्श कृषी आधारित उद्योजक शेतकरी म्हणून ज्योतेष गुंड, नैसर्गिक विषमुक्त शेती या गटात गणेश भुट्टे, आदर्श महिला शेतकरी म्हणून महानंद गुडे, आदर्श फूल उत्पादक शेतकरी म्हणून अशोक बहिर्जे, युवा शेतकरी म्हणून अक्षय गव्हाणे यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच दुग्ध उत्पादक शेतकरी या गटात विशाल माने, श्रीधर गायकवाड, संजय बहिर्जे आणि हरीष जाधव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी, कृषीप्रेमी नागरिक आणि भाजप ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विनायक अभिमन्यू सुतार यांनी केले आहे.



