सोलापूर

आषाढी वारी २०२६ : सोलापूर जिल्ह्यात ८१ गावांतून पालखी मार्गक्रमण; लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषदेची भव्य तयारी

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य सिईओ कुशल जैन आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी मांडला वारी नियोजनाचा सविस्तर आराखडा

आषाढी वारी २०२६ : सोलापूर जिल्ह्यात ८१ गावांतून पालखी मार्गक्रमण; लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषदेची भव्य तयारी

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य सिईओ कुशल जैन आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी मांडला वारी नियोजनाचा सविस्तर आराखडा

सोलापूर : आषाढी वारी २०२६ निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होत असून लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, निवारा, महिला सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांचा समावेश असलेली सर्वंकष यंत्रणा उभारण्यात आली असून संपूर्ण जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन तसेच उपाध्यक्ष व अर्थ-बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातून पालखी सोहळा तब्बल ८१ गावांमधून मार्गक्रमण करणार असून ३८ मुक्काम, ४३ विसावे आणि ७ रिंगण सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या मूलभूत सुविधांवर विशेष भर देत प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभारली आहे.

*संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (सोलापूर जिल्हा)*

धर्मपुरी – कोंडी – मोहोळ – नांदगाव – पुरणगावडे – शेटफळ – अंकोली – वडाळा – पाजरकडी – लोणंदे – भंडीशेगाव – वाखरी – पंढरपूर

*रिंगण स्थळे*

नांदगाव
बुढेहळवटी
पाजरकडी (थोरले रिंगण)
भंडीशेगाव
एकूण अंतर : ७७ कि.मी.

*संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (सोलापूर जिल्हा)*

अकलूज – माळीनगर – सदाशिवनगर – वेळापूर – बोरगाव – शेगाव – वडापुरी – शिवरी – भंडीशेगाव – वाखरी – पंढरपूर

*रिंगण स्थळे*

माळीनगर
सदाशिवनगर
वेळापूर
वडापुरी
भंडीशेगाव
एकूण अंतर : ४२ कि.मी.

वारीदरम्यान स्वच्छतेसाठी ५ हजार तात्पुरती व फिरती शौचालये उभारण्यात येणार आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी दररोज १८०० तर संत तुकाराम महाराज पालखीसाठी १२०० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र ५०० स्नानगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पालखी मार्गावर २२० पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. सर्व जलस्रोतांची गुणवत्ता तपासूनच पाणीपुरवठा केला जाणार आहे.

मुक्कामाच्या ठिकाणी २३ जर्मन हँगर आणि ३७ वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये ओपीडी सेवा, हिरकणी कक्ष, मोबाईल चार्जिंग सुविधा, पंखे आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी १३ मेडिसिन ऑन व्हील्स आरोग्य रथ चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. याशिवाय १५८ तात्पुरती आरोग्य सल्ला केंद्रे, १२१ बाईकवरील आरोग्य दूत आणि २१ आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सेवेसाठी ४४० वैद्यकीय अधिकारी, ४३५ कर्मचारी आणि २,८२२ आशा सेविका नियुक्त करण्यात आल्या आहेत.

वारकऱ्यांच्या सोयीसाठी ७५० चरणसेवा (फूट मसाजर) मशीन, १५ मोबाईल चार्जिंग व्हॅन, १६७ हिरकणी कक्ष, तसेच सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीनची सुविधा उपलब्ध राहणार आहे. पालखी मार्गावर मोफत जल सलून केंद्रेदेखील सुरू करण्यात येणार आहेत.

वारी काळात कचरा व्यवस्थापन, जंतुनाशक फवारणी, अन्न सुरक्षा तपासणी आणि सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजनांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. लाखो वारकऱ्यांचे सुरक्षित, स्वच्छ आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा, भक्ती आणि समतेचा संदेश देणारी आषाढी वारी २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून राज्याच्या विविध भागांतून निघालेल्या दहा प्रमुख मानाच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यंदा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह संत मुक्ताबाई, संत सोपान महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ महाराज, संत गजानन महाराज, श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, संत चांगावटेश्वर आणि संत निळोबाराय महाराज यांच्या पालख्यांचेही सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषद, महसूल, पोलीस, आरोग्य आणि विविध शासकीय विभागांकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. लाखो वारकऱ्यांच्या निवास, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ८ जुलै रोजी आळंदी येथून प्रस्थान करून १९ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी ७ जुलै रोजी देहूहून निघून २० जुलै रोजी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

संत मुक्ताबाई पालखी २४ जून रोजी मुक्ताईनगर येथून निघाली असून १९ जुलै रोजी जिल्ह्यात पोहोचणार आहे. संत सोपान महाराज पालखी १२ जुलै रोजी सासवड येथून प्रस्थान करून २० जुलैला जिल्ह्यात दाखल होईल.

त्र्यंबकेश्वर येथून २९ जून रोजी निघालेली संत निवृत्तीनाथ महाराज पालखी १८ जुलै रोजी, तर पैठण येथून ७ जुलैला निघालेली संत एकनाथ महाराज पालखी १९ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात पोहोचणार आहे.

शेगावहून २१ जून रोजी निघालेली संत गजानन महाराज पालखी १७ जुलै रोजी, तर कौंडण्यपूर येथून १९ जून रोजी निघालेली श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानाची पालखी १६ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणार आहे.

याशिवाय संत चांगावटेश्वर महाराजांची पालखी १२ जून रोजी सासवड येथून प्रस्थान करून २० जुलैला, तर संत निळोबाराय महाराजांची पालखी १० जुलै रोजी पिंपळनेर येथून निघून १९ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

यंदाच्या वारीतील महत्त्वाचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. १९ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन होणार असून २० जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे दाखल होणार आहे.

२५ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार असून लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये एकत्र येणार आहेत.
त्यानंतर २९ जुलै रोजी गोपाळपूर येथे पारंपरिक गोपाळकाला उत्सव होणार आहे. त्याच दिवशी महाद्वारकाला सोहळ्याने आषाढी वारी २०२६ ची सांगता होणार आहे.

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या आषाढी वारीत दरवर्षी लाखो वारकरी सहभागी होतात. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि संतांच्या अभंगांनी दुमदुमणारा हा सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानला जातो. यंदाही लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर निघाले असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता विठूरायाच्या भेटीकडे लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!