विहिरीत पडलेल्या बैलाला मिळाले जीवदान; सागर कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने यशस्वी बचावकार्य
चिक्केहळ्ळी गावातील घटना; ग्रामस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्याला सुरक्षित बाहेर काढले

विहिरीत पडलेल्या बैलाला मिळाले जीवदान; सागर कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने यशस्वी बचावकार्य
चिक्केहळ्ळी गावातील घटना; ग्रामस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्याला सुरक्षित बाहेर काढले
अक्कलकोट(प्रतिनिधी):-तालुक्यातील चिक्केहळ्ळी गावात विहिरीत पडलेल्या एका बैलाला ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची हृदयस्पर्शी घटना घडली. या बचावकार्यात पंचायत समितीचे उपसभापती सागर दादा कल्याणशेट्टी यांनी दाखवलेली तत्परता आणि नेतृत्वामुळे एका मुक्या प्राण्याचे प्राण वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एक बैल अचानक तोल जाऊन विहिरीत पडला. घटनेची माहिती मिळताच सागर दादा कल्याणशेट्टी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी ग्रामस्थांना मदतीसाठी एकत्र केले तसेच बचावकार्याचे नियोजन करून विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला.
अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने बैलाला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात यश आले. या वेळी उपस्थित नागरिकांनीही बचावकार्यात मोलाचे योगदान दिले. बैल सुखरूप बाहेर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

आजच्या धावपळीच्या युगात मुक्या प्राण्याच्या जीवासाठी तत्परतेने पुढे येत सागर दादा कल्याणशेट्टी यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांच्या या कार्यातून प्राणीमात्रांविषयी असलेली संवेदनशीलता, समाजसेवेची भावना आणि संकटसमयी नेतृत्व करण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे.
या घटनेमुळे चिक्केहळ्ळी गावात माणुसकी, दयाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश पोहोचला असून, सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



