सोलापूर

शेतकऱ्याशी गैरवर्तन भोवले; कासेगावच्या सहायक कृषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

सरपंचांसह ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची तातडीची दखल; विभागीय चौकशीचे संकेत

शेतकऱ्याशी गैरवर्तन भोवले; कासेगावच्या सहायक कृषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

सरपंचांसह ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची तातडीची दखल; विभागीय चौकशीचे संकेत

सोलापूर (प्रतिनिधी):- शेतकऱ्याशी अर्वाच्य भाषेत बोलून गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील सहायक कृषी अधिकारी अमोल नामदेव देवकर यांच्यावर कृषी विभागाने तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे. पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, या घटनेमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कासेगाव येथील शेतकरी अजित जाधव यांच्याशी संवाद साधताना सहायक कृषी अधिकारी देवकर यांनी अयोग्य व आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर गावातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. सरपंच यशपाल वाडकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी स्वाक्षरीयुक्त निवेदन तयार करून कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली.

२९ मे रोजी प्राप्त झालेल्या या तक्रारीची कृषी विभागाने गांभीर्याने दखल घेत तत्काळ प्राथमिक चौकशी सुरू केली. चौकशीत समोर आलेल्या बाबींच्या आधारे विभागीय कृषी सहसंचालकांनी अमोल देवकर यांना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.

या कारवाईमुळे शेतकऱ्यांशी असभ्य वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कृषी विभाग कठोर भूमिका घेत असल्याचा संदेश गेला आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल विभागीय चौकशी होणार असून, संबंधित तक्रारीची विस्तृत पडताळणी सुरू असल्याचेही समजते.

शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील संवाद अधिक विश्वासार्ह आणि सुसंवादी राहावा, यासाठी अशा प्रकारच्या तक्रारींवर तातडीने कारवाई केली जाणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!